मुंबई, दि. १३- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे गिरगाव आणि वरळी येथील तसेच माता रमाबाई यांचे वरळी येथील प्रस्तावित स्मारक प्रेरणादायी व्हावे, असे निर्देश पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. याचबरोबर काळा घोडा परिसरात सुटीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या पाहता येथील पादचारी रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याची सूचना त्यांनी केली.
मंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे यासंबंधीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार, वाहतूक विभागाचे अतिरिक्त आयुक्त सत्यनारायण चौधरी, महानगरपालिकेचे उपायुक्त हर्षद काळे, सहायक आयुक्त शरद उघडे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, दोन्ही स्मारकांना भेट देणाऱ्या भाविकांना येथे आल्यावर प्रसन्न वाटेल आणि या महान व्यक्तिमत्वांच्या कार्याची माहिती मिळेल तसेच ही उत्कृष्ट स्मृतीस्थळे ठरतील असे आकर्षक डिझाईन तयार करून घ्यावे. स्मारक आणि परिसरात छोटे उद्यान तयार करून तेथे भेट देणाऱ्यांसाठी बसण्याची सोय करावी. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या गिरगावमधील प्रस्तावित स्मारकाजवळ क्यूआर कोड द्वारे त्यांच्या कार्याची माहिती देता येईल का याचाही प्रयत्न करावा. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या वरळी परिसरातही चांगले स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
काळा घोडा परिसरात सुटीच्या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने येतात. या भागात फिरण्यासाठी मुख्य रस्त्यांबरोबरच आतील जोड रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी सुविधा तयार करण्याच्या तसेच या रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याच्या सूचनाही श्री. ठाकरे यांनी दिल्या. या कामाबरोबरच त्यांनी दहिसर येथे तसेच शहरातील विविध रस्त्यांवर होणारी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सुरू असलेले काम, गिरगाव चौपाटीजवळ सुरू असलेले दर्शक गॅलरी चे काम आदींचाही आढावा घेऊन कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2X7tZ0v
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment