मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र आणि ग्रेटर मँचेस्टर (यू.के.) यांच्यातील व राजनैतिक दोन्ही बाजूंचे आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसेच स्टार्टअप परीसंस्थेस चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि ग्रेटर मँचेस्टर यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर कौशल्य विकास विभागाचे आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आणि मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहॅम यांनी स्वाक्षरी केल्या.
या ऑनलाईन कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विकास मंत्री नवाब मलिक, प्रधान सचिव श्रीमती मनिषा वर्मा त्याचबरोबर व्यापार वाणिज्यदूत ॲलन गेमेल, मँचेस्टर इंडिया पार्टनरशिपच्या (एमआयपी) कार्यकारी संचालक स्नेहला हसन, तसेच नाविन्यता सोसायटी व मँचेस्टरचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या भागीदारीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य आणि मँचेस्टरमधील स्टार्ट-अप इकोसिस्टम, इनक्यूबेटर्स, नाविन्यता परिसंस्थेतील इतर घटकांशी समन्वय साधून सर्वोत्तम कार्यपद्धती, माहिती व उपक्रमांची देवाण घेवाण करणे आहे. महाराष्ट्रातील इनक्यूबेटर्सच्या सर्वांगीण विकासासाठी मँचेस्टरमधील विद्यापीठांच्या माध्यमातून क्षमता बांधणी सत्रेदेखील आयोजित केली जाणार आहेत. आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, आरोग्य, प्रगत उत्पादन, शाश्वतता इत्यादी परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात स्टार्ट-अप्सचा समन्वय घडवून आणण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे तसेच डॉक्टर आणि परिचारिकांसाठी प्रशिक्षण, यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधींकरिता भागीदारी करणे हे, या सामंजस्य कराराचा भाग आहे.
या करारामुळे महाराष्ट्र राज्य व मॅंचेस्टरमधील व्यापार, शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये देवाणघेवाणाची प्रक्रिया सुलभ होणार आहे. मँचेस्टर येथील विद्यापीठांमधील संभाव्य संशोधन विकासाबरोबरच विविध प्रयोगशाळा स्थापित करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणे सोपे होणार आहे.
या सामंजस्य काराराच्या दरम्यान कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ग्रेटर मॅंचेस्टर शहराने नाविन्यता, डिजिटायझेशन, आरोग्य सेवा आणि शून्य कार्बन धोरण या विषयांवर केलेल्या कामांचे कौतुक केले. या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य आणि ग्रेटर मॅंचेस्टर यातील संबंध अधिक बळकट होतील आणि भविष्यातील विकासासाठी चालना देणार असेल असे मत व्यक्त केले.
मॅंचेस्टर भारत भागीदारी (Manchester India Partnership) :
पुरस्कार विजेता मॅंचेस्टर इंडिया पार्टनरशिप कार्यक्रम फेब्रुवारी 2018 मध्ये सुरू करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील उद्योग, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक क्षेत्रांमधील औद्योगिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संबंधांचे बाळकटीकरण करणे आहे. थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) ब्रिटनमधील प्राथमिक स्त्रोत आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळख झालेल्या भारताच्या महत्त्वाकांक्षाचा सुरेख संगम या कार्यक्रमामार्फत झाला आहे.
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीविषयी
महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्ण संकल्पनांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्ट अप धोरण 2018” यास 5 फेब्रुवारी 2018 रोजी मान्यता देण्यात आली. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी “महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी” कार्यरत आहे. या धोरणातील मुख्य उद्दिष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, स्टार्ट-अप्सना सक्षम करणे, नियामक रचना सुलभ करणे व मजबूत पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे इत्यादीचा समावेश आहे. याअंतर्गत राज्यात कौशल्य विकास विषयक विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी www.msins.in हे संकेतस्थळ आहे.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3iToev7
https://ift.tt/3AAzum6
No comments:
Post a Comment