पर्यटकांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सज्ज - latur saptrang

Breaking

Tuesday, October 12, 2021

पर्यटकांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सज्ज

मुंबई, दि. १२ : कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच पर्यटनस्थळे खुली करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. पर्यटक देखील हिवाळी पर्यटन हंगामासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासाचे आरक्षण करून पर्यटनाचे नियोजन करू लागल्याचे दिसून येत आहे. गुलाबी थंडीची चाहूल आणि दीपावलीच्या सुटीचे वेध लागले असल्याने पर्यटकांची पावले पर्यटन स्थळांकडे वळू लागली असल्याने महामंडळानेही विविध सोयी- सुविधा आणि विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.

थंडी आणि पर्यटकांच्या स्वागतासाठी महामंडळाने जय्यत तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या www.mtdc.co या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. पर्यटक केंद्रस्थानी ठेवून ‘अतिथी देवो भव’ या नात्याने पर्यटकांना नेहमीच सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी तत्पर असलेल्या महामंडळाची नवीन सुविधांसह अद्ययावत करण्यात आलेल्या या संकेतस्थळामुळे नव्याने ओळख होत आहे. आता सुट उपलब्ध असल्यास पर्यटनासाठी घरातून बाहेर पडतानाही नवीन संकेतस्थळावरून आरक्षण करता येणार आहे. याचबरोबर महामंडळाची नूतनीकरण झालेली पर्यटक निवासे आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग पर्यटकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

महामंडळाने हिवाळी पर्यटन आणि दीपावली सुट्यांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची जोरदार तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी–माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगमध्ये 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहे. शालेय सहलींसाठीही विशेष सवलती देण्यात येत आहेत. याबरोबरच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळाने पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी १ ऑक्टोबरपासून  ‘कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट’ ची सुरूवात केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता महामंडळाच्या पर्यटक निवासात पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. उपहारगृह, रिसॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरून पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर अशी व्यवस्था पुर्वीपासूनच करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून ‘प्री–वेडींग फोटोशूट’ आणि ‘डेस्टीनेशन वेडींग’चीही सोय करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co या वेबसाईटर ऑनलाईन आरक्षणही सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यात येणार असून पर्यटकांसाठी ‘कॉम्प्लीमेंटरी ब्रेकफास्ट’सह नाविन्यपूर्ण अशा ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ या संकल्पनेअंतर्गत काही रिझॉर्टवर वायफाय सुविधा पुरविण्यात येत आहेत. अशा विविध सोयी सुविधांसह  पर्यटकांच्या स्वागतासाठी महामंडळ सज्ज असल्याने पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3asVtkv
https://ift.tt/3v2c08p

No comments:

Post a Comment