मुंबई, दि. 13 : महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा. नवमतदारांनी नोंदणीसाठी स्वत:हून सहभाग घ्यावा. यासाठी विशिष्ट टॅगलाईनचा उपयोग करणाच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज झालेल्या बैठकीत महानगरपालिकेला केल्या.
या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव अतुल जाधव, सहाय्यक आयुक्त (जनसंपर्क) जगदिश मोरे, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.
नवीन मतदार नोंदणीसाठी स्वीपअंतर्गत नवनवीन संकल्पना राबवून नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. यात उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या नवतरूणांसाठी बॅनर्स, पोस्टर्स तसेच व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर देण्यात यावेत. हाऊसिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांचाही मतदार नोंदणीसाठी सहभाग घ्यावा, अशा सूचनाही श्री.देशपांडे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
नवमतदारांना आवाहन करण्यासाठी समाजमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या संस्थांनाही अंतर्भूत करण्यात यावे. यासाठी क्रियेटिव्ह तयार करून त्यांचा समाजमाध्यमाद्वारे जास्तीत जास्त प्रसार करण्यात यावा. 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरूणांना मोबाईलवरून नोंदणी करता यावी यासाठी सुविधा केंद्रे उपलब्ध करून द्यावीत. कोविड काळात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे त्यातूनही नोंदणी न केलेल्यांना मतदार नोंदणी करण्याबाबत संदेश द्यावा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी केल्या.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3AALNyN
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment