डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती - latur saptrang

Breaking

Wednesday, October 13, 2021

डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती

मुंबई, दि. 13 : कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. महामंडळावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री  तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

             परिवहनमंत्री श्री.परब म्हणाले, कोरोना संकटामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाल्याने त्याचा उत्पन्नाला फटका बसला आहे. त्यातच डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या 17 हजार बसेस असून डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या 34 टक्के इतका होता. वाढत्या डिझेल किमतीमुळे तो आता 38 ते 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिझेलवर होणाऱ्या कोट्यावधी रूपयांच्या खर्चाचा गांभीर्याने विचार करत डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपूरक इंधनावर धावणाऱ्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपूरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार आहे.  इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी सीएनजीबरोबरच इतर पर्यायांचाही वापर करण्याचे निर्देश श्री. परब यांनी दिले आहेत.

            वातावरणीय बदलामुळे बिघडलेले निसर्गचक्र अबाधित ठेवण्यासाठी तसेच डिझेलच्या वाढत्या किमती पाहता प्रवाशांना प्रदूषणमुक्त प्रवास घडविण्यासाठी एसटी महामंडळाने पर्यावरणपूरक इंधनाचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी सध्या डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजी या पर्यायी इंधनामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या रिट्रोफिटमेंटसाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला निधी देणार आहे. सीएनजीमुळे इंधनाचा खर्च कमी होऊन प्रदूषणामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यास एसटी महामंडळाचा नक्कीच हातभार लागेल, असा विश्वासही श्री. परब यांनी व्यक्त केला.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3v6lBec
https://ift.tt/39f9xgE

No comments:

Post a Comment