उसणे पैसे परत मिळत नसल्याच्या होता त्रास
पोलीस कर्मचाऱ्याची स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या
सुसाईट नोटमुळे घटनेची झाली पोलखोल
औसा, :-उसणे घेतलेले पैसे परत मिळत नसल्याच्या त्रासाला कंटाळून किल्लारी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतः वर रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. साहेबराव सावंत असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नांव आहे.
सुसाईड नोटमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी १६ जणांविरुद्ध किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
किल्लारी (ता.औसा ) येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक साहेबराव सावंत ( ३८ वर्षे ) यांच्याकडून धनराज सूर्यवंशी रा. हालसी (ता.निलंगा ) यांनी २०१७ साली ९ लाख ५० हजार रूपये उसणे घेतले होते. वारंवार विचारणा करूनही उसणे पैसे न देता उलट साहेबराव सावंत यांना शिविगाळ करून मारहाण करण्यात आली होती.जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या त्रासाला कंटाळून कर्तव्यावर असताना रविवारी मध्यरात्री ०२:१५वाजेच्या सुमारास त्यांनी सीसीटीएनएस कक्षात रायफलने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली. हा आवाज ऐकून पोलीस नाईक कृष्णा गायकवाड घटनास्थळी पोहचले. तात्काळ या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सूनील गायकवाड यांना दिली. त्यानुसार घडल्या प्रकाराची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली.
त्यानुसार पोलीस अधीक्षक निखील पिंगळे , औसा उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती घेतली. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या सर्वोपचार रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.
याप्रकरणी सुदाम संतराम सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनराज सूर्यवंशी, सलीम सय्यद, पोलीस कर्मचारी बेग, पोलीस कर्मचारी काळे,पोलीस कर्मचारी मामडगे, चंदू पाटील, चंदू बरमदे, सोनू पाटील, राजू सूर्यवंशी, शिवसेनेचे निलंगा येथील ईश्वर पाटील, सलीम सय्यद, गायकवाड यांच्यासह अन्य चार अशा १६ जणांविरुद्ध भादवी कलम-३०६,४२०,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित लोकांना ताब्यात घेण्यात येईल असे पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी येथील रहिवासी असलेल्या साहेबराव सावंत यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन लहान मुली असा परिवार आहे. साहेबराव सावंत यांच्या टोकाच्या भुमिकेमुळे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर एकच आक्रोश केला होता. पुढील तपास सपो नी सुनील गायकवाड हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment