जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ - latur saptrang

Breaking

Friday, May 13, 2022

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. 12 : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील एकूण 10 हजार 127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत  आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पाच पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याबाबत मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सर्व जिल्हा परिषदांना निर्देश दिले आहेत.

आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची 47 पदे, औषध निर्मात्याची 324 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची 96 पदे, आरोग्य सेवक (पुरूष) याची 3 हजार 184 पदे आणि आरोग्य सेविकांची 6 हजार 476 पदे अशी एकूण 10 हजार 127 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार या पाच संवर्गासाठी एकूण 4 लाख 2 हजार 12 अर्ज प्राप्त झाले असून या प्राप्त अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे निर्देश मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिले.

आरोग्य विभागाशी संबंधित 5 संवर्ग वगळता इतर संवर्गातील पदांबाबत जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सुधारित आकृतीबंध अंतिम करून त्यास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत लवकरच करण्यात येणार असल्याचेही श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://mahasamvad.in/?p=67411
https://ift.tt/X0jS6yW

No comments:

Post a Comment