मुंबई, दि. 26 : फूड सेफ्टी ॲण्ड स्टँडर्स ॲथॉरीटी ऑफ इंडिया (FSSAI), नवी दिल्ली द्वारे नागरिकांचे आरोग्य व पोषणस्तर सुव्यवस्थित राहण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून, प्रतिवर्षी संपूर्ण भारतात इट राईट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच धर्तीवर यावर्षीदेखील महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषधी प्रशासन विभाग (मुंबई विभाग) आणि पाथ (PATH) या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे इट राईट कार्यक्रमाचे आयोजन २२ जुलै रोजी आयोजन दादासाहेब फाळके चित्रपट नगरी (फिल्मसिटी) येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन जाधव होते.
यावेळी डॉ.जाधव यांनी मार्गदर्शन करताना इट राईट इंडिया कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. आपल्याला अन्नधान्याची कमतरता राहिली नाही, परंतु बदलत्या राहणीमानामुळे आपल्या आहारामध्ये कॅलरीज जास्त तर सूक्ष्म पोषक द्रव्यांच्या कमतरतेचे प्रमाण वाढले आहे. कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण – ५ (२०१९-२१) मध्ये भारतात तसेच महाराष्ट्रात एनिमिया आणि बालकांमधील वाढत्या कुपोषणाची समस्या अधोरेखित केली गेली. ५ वर्षाखालील दोन तृतीयांश मुलांमध्ये एनिमिया तर 50 टक्क्याहून अधिक महिलांमध्ये एनिमिया चे प्रमाण आढळले आहे. असे डॉ.जाधव यांनी सांगितले.
पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाच्या सेवनाने शरीरात सूक्ष्म पोषणतत्वांची कमी दूर होण्यास मदत होते, या तांदळाद्वारे लाभार्थींना त्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि आवश्यक पोषकतत्वे मिळण्यास मदत होते, या तांदळात लोह, फॉलिक ऍसिड आणि बी – १२ जीवनसत्व असतात तसेच या तांदळात अजून ६ ऐच्छिक पोषकतत्वे टाकली जाऊ शकतात जसे कि, जीवनसत्व बी – १, बी – २, बी – ३, बी – ६, जीवनसत्व- ए आणि झिंक, या तांदळामुळे महाराष्ट्रातील एनिमियाच्या वाढत्या प्रभावास आळा बसण्यास मदत होईल.
प्लास्टिकचा तांदुळ नाही – पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ
पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ हा आपला नेहमीचाच तांदूळ असतो पण त्यात १०० : १ (१०० दाणे सध्या तांदळाचे आणि १ दाणा पोषणतत्व गुणसंवर्धन केलेला) या प्रमाणात असतो. समाजात सामाजिक माध्यमाद्वारे अनेक गैरसमज पसरवले जात आहेत त्या पैकी एक म्हणजे प्लास्टिक तांदूळ. प्लास्टिक तांदूळ हा अस्तित्वात नसतो, अशा गैरसमजामुळे सरकारच्या अशा महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोचू शकत नाही म्हणून असे गैरसमज दूर करण्यासाठी समाजामध्ये एकात्मिक बाल विकास सेवेची यंत्रणा मोठी भूमिका बजावू शकतात. मंचावरील मान्यवरांनी या कार्यक्रमात बोलताना अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला.
भारतातील आरोग्य व पोषण समस्यांना उत्तर म्हणून विविध योजनांची सुरुवात केली गेली तथापि, या समस्या अजूनही भेडसावत आहेत. याच संदर्भात केंद्र सरकारने सर्व सरकारी सामाजिक कार्यक्रमांद्वारे पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे वितरण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून, योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत, मार्च २०२१ मध्ये केंद्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि मध्यान्ह भोजन योजनेद्वारे पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे वितरण सुरु केले आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये या जिल्हांतील शिधा-पत्रिकाधारकांना देखील पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे वितरण सुरु केले जाणार आहे. योजनेच्या तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात मार्च २०२३ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात शिधा – पत्रिकाधारकांना पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे वितरण केले जाणार आहे, यासाठी शासन युद्धपातळीवर कार्य करत आहे.
या कार्यक्रमात अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी व गोरेगाव आणि बोरिवली क्षेत्रातील अनेक अंगणवाडी सेविका, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या प्राध्यापक तसेच तेथील विद्यार्थिनी आणि ‘पाथ’ संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळापासून बनवलेले अन्नपदार्थ अल्पोपाहारात ठेवण्यात आले होते जेणेकरून त्यांच्याद्वारे समाजात हा संदेश जावा की पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ चवीस आणि खाण्यास नेहमीच्या तांदळासारखाच असतो परंतु त्याच्या सेवनाने आपणास आवश्यक पोषकतत्वे सहजरित्या मिळतात.
**
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/k8uB01i
https://ift.tt/fWZVx9a
No comments:
Post a Comment