आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत  विविध उपक्रमांचे आयोजन - latur saptrang

Breaking

Thursday, September 22, 2022

आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत  विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. २२ :- गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व राज्य शासनाची ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना एकत्रित स्वरुपात गेल्या चार वर्षांपासून राज्यात राबविण्यात येत आहेत. योजनेच्या पाचव्या वर्षात पदापर्णानिमित्त १५ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ‘आयुष्मान भारत पंधरवडा’ साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील वंचित घटकांना डोळ्यासमोर ठेवून प्रथमत: गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई उपनगर, मुंबई शहर या आठ जिल्ह्यांत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु करण्यात आली असून, राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांत योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील ७३ लक्ष नागरिकांनी सदर योजनेंतर्गत वैद्यकीय उपचारांचा मोफत लाभ घेतलेला आहे. राज्यातील दुर्गम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकरी, आदिवासी भागातील लाखो बांधवांना त्यांच्या नजीकच्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याने ही योजना खऱ्या अर्थाने आरोग्यदायी ठरली आहे.

विद्यार्थ्यांमार्फत व्यापक जनजागृतीसाठी राज्यातील १२०० शाळांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये योजनेच्या संकल्पनेवर आधारित रांगोळी स्पर्धा, चित्रकला, पोस्टर रंगविणे, निबंध, घोषवाक्य असे विविध उपक्रम राबविण्यात येत असून, उपक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक तसेच प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ७० आरोग्यमित्रांचा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या काही लाभार्थींसोबत केंद्रीय आरोग्यमंत्री २३ सप्टेंबर, २०२२ रोजी संवाद साधणार आहेत.

‘आयुष्मान भारत’ पंधरवड्यात ६०० पेक्षा जास्त आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड (ई-कार्ड) वितरित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आरोग्याच्या संपूर्ण माहितीचे आभा कार्ड वितरित करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थीला ५ लक्षपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार, तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत १ लक्ष ५० हजारापर्यंत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी २ लक्ष ५० हजारापर्यंत प्रती कुटुंब प्रति वर्ष विमा संरक्षण दिले जात आहे. या आरोग्य योजनेमध्ये ३४ विशेषज्ञ सेवांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवा व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ शस्त्रक्रिया/चिकित्सा/उपचार व १८३ पाठपुरावा सेवा नागरिकांना मिळत आहे. तसेच रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण उपचार, रोगनिदान चाचण्या, आंतररुग्ण (शस्त्रक्रिया, भूल, औषधे) उपचार व भोजन यावरील संपूर्ण खर्च मोफत केला जातो. त्याचप्रमाणे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर रुग्णास परतीचा एस.टी. किंवा रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवासाचा खर्च दिला जातो.

०००

श्रद्धा मेश्राम/उपसंपादक/22.9.22

 

 



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/8xEfBXo
https://ift.tt/dEv4Dix

No comments:

Post a Comment