पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणाऱ्या भागात ‘पूल-वजा-बंधारे’ तंत्रज्ञानाचा वापर करा – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन - latur saptrang

Breaking

Wednesday, September 29, 2021

पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणाऱ्या भागात ‘पूल-वजा-बंधारे’ तंत्रज्ञानाचा वापर करा – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

मुंबई, दि. २९ – राज्याच्या ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते त्या भागात पूल-वजा-बंधारे करण्याच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करतानाच कमी खर्चात शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणाऱ्या या तंत्रज्ञानाची माहिती सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्पचित्र मंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पूल-वजा-बंधाऱ्याचे संकल्पचित्र आणि मार्गदर्शक तत्त्वे’ या पुस्तकाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास सार्वजनिक विभागाचे सचिव श्री. उल्हास देबडवार यांचेसह तज्ज्ञ समितीचे निवृत्त प्रधान सचिव प्रमोद बोंगिरवार, निवृत्त सचिव (रस्ते) कृष्णा जांगडे, राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे अधीक्षक अभियंता मनोज जयस्वाल, नागपूरच्या व्हीएनआयटी कॉलेजचे प्रा. डॉ. रमाकांत इंगळे, नागपूरच्या इनोव्हेटिव्ह कन्स्ट्रक्शनचे संचालक गरीबदास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

सिमेंट प्लग बंधाऱ्यासाठी जितका खर्च येतो त्याच्या निम्म्या किंमतीत पूल-वजा-बंधाऱ्याची निर्मिती होते. जुन्या पूलांवरही हे बंधारे बांधता येतील असे हे तंत्रज्ञान असून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणाऱ्या भागासाठी हे पूल-वजा-बंधारे वरदान ठरतील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

 

राज्यात प्रायोगिक तत्वावर १६ ठिकाणी हे पूल-वजा-बंधारे बांधण्यात आले असून टंचाईवर होणारा खर्च पाहता हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरल्यास त्याचा निश्चित लाभ होईल, त्याकरिता सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरण्याच्या सूचनाही यावेळी श्री. चव्हाण यांनी दिल्या. नांदेड जिल्ह्यातील भोकर, मुदखेड आदी ठिकाणी अशा प्रकारचे बंधारे किती ठिकाणी घेता येतील याविषयी चाचपणी करण्याचे निर्देशही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.

 

पूल-वजा-बंधारा बांधण्यासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देतानाच नाबार्डच्या स्वतंत्र प्रस्तावात या तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.

 

काय आहे ‘पूल-वजा-बंधारे’ तंत्रज्ञान?

पूलाचे रुपांतर पूल-वजा-बंधाऱ्यात कसे करायचे याविषयीची सविस्तर माहिती ‘पूल-वजा-बंधाऱ्याचे संकल्पचित्र आणि मार्गदर्शक तत्त्वे’ या पुस्तकात देण्यात आली आहे. या पूल-वजा-बंधाऱ्यांचा खर्च सिमेंट बंधाऱ्याच्या तुलनेत ५० ते ६० टक्के इतकाच येतो तसेच पाण्याचा साठा करण्यासाठी शासनाने ठरविलेल्या मानकाच्या तुलनेत ६० ते ७० टक्के इतकाच खर्च येत असल्यामुळे हे एक नाविन्यपूर्ण आणि किफायतशीर असे तंत्रज्ञान आहे. हे बांधकामाचे तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे स्थानिक साधने आणि कुशल कामगारांच्या मदतीने हे काम पूर्ण करता येऊ शकते. गावाजवळील नाल्यांचा उतार जास्त असल्यामुळे पाऊस थांबल्यावर पाणी पूर्णपणे ओसरुन जाते त्यामुळे विहिरींमध्ये पाणी पातळी वाढण्यास विशेष मदत होत नाही मात्र, त्या गावाजवळील पूलाचे रुपांतर हे तंत्रज्ञान वापरून बंधाऱ्यात केल्यास प्रत्येक गाव पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण करता येणे शक्य आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पूल-वजा-बंधारे तंत्रज्ञानाचे संकल्पचित्र विकसित करण्यासाठी व त्याच्या अभ्यासासाठी पुणे, अमरावती येथील अभियांत्रिकी महाविद्यालये, चंद्रभागा नदीचे कालवे येथे अभ्यास करून संकल्पचित्र विकसित करण्यात आले आहे. शेगावजवळील कतरगाव येथे या तंत्रज्ञानाचा वापर करून २४ लाख रुपये खर्चून बंधारा बांधल्याने परिसरातील विहीरींची पाणी पातळी ९० फुटांवरुन ७० फुटांवर आली आहे. अकोला जिल्ह्यातील अपोती गावामध्येदेखील या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

००००

किशोर गांगुर्डे, विभागीय संपर्क अधिकारी, २९.०९.२०२१



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3iit6cN
https://ift.tt/39f9xgE

No comments:

Post a Comment