महिलांच्या सुरक्षेबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे केंद्रीय गृहमंत्री व संरक्षण मंत्री यांना निवेदन - latur saptrang

Breaking

Friday, September 24, 2021

महिलांच्या सुरक्षेबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे केंद्रीय गृहमंत्री व संरक्षण मंत्री यांना निवेदन

पुणे/दिल्ली दि. २४ : महिला सुरक्षिततेसंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन दिले आहे. संपूर्ण देशस्तरावर महिला व मुले यांच्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेसाठी विशेष सुविधा व कार्यपद्धती (SOP) होणे आवश्यक आहे असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

महिला सुरक्षेसाठी कार्य करत असतांना दक्षता, योजना आणि पायाभूत सुविधांच्या कार्यपध्दतीबद्दल चांगली निगराणी आवश्यक आहे. रस्ते वाहतूक व रेल्वे वाहतुकीतील सुरक्षा प्रश्नांविषयी बैठक घेवून यावर विशेषत्वाने काम करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींना यावेळी बोलावण्यात यावे, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.  त्या आधाराने संबंधित विभागांना आणि संबंधित मंत्रालयांना योग्य त्या सूचना देण्यास तसेच विविध स्वरुपाच्या अत्याचाराच्या घटना आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन  प्रत्यक्षात कसा आणता येईल याचा देखील विचार करता येऊ शकेल अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

पोलीस दलात त्याचप्रमाणे तीनही सैन्यदलात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु त्यामध्ये काम करत असणाऱ्या महिलांवरही अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अत्याचारपीडित महिलांना सर्वतोपरी मदत मिळण्यासंदर्भात स्पष्ट माहिती देण्याची विनंती देखील या पत्राच्या माध्यमातून डॉ. गोऱ्हे यांनी संरक्षण मंत्री श्री. सिंह यांना केली आहे.

देशाचे संरक्षण करणाऱ्या महिलांवर सार्वजनिक ठिकाणी झालेले अत्याचार अथवा कौटुंबिक हिंसाचार यासंदर्भात महिलांना मदत करणारी यंत्रणा सरकारने त्यांच्या पाठीशी उभी करणे गरजेचे आहे. या यंत्रणेमध्ये वैद्यकीय, अर्थिक पाठबळ, सामाजिक समुपदेशन, पुनर्वसन याचा देखील सहभाग आवश्यक आहे, असेही डॉ.गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2Y0mQ2t
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment