नवी दिल्ली : भाजपकडून राज्यांतील मुख्यमंत्री पदावरचे चेहरे बदलण्याचा सपाटा सुरू असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही चिंताग्रस्त अवस्थेत दिसून येत आहेत. मुख्यमंत्री चौहान सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात केंद्रीय मंत्र्यांसोबत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. नड्डा यांच्याशी पक्षासंबंधात चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.
दिल्लीत भेटीगाठी
बुधवारी शिवराज सिंह चौहान यांनी भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आर के सिंह यांची भेट घेतली. राज्यात सरकारद्वारे होत असलेल्या विकासकार्यांची माहिती नड्डा यांना दिल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं.
उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातचे मुख्यमंत्री बदलून भाजपनं आपल्या नेत्यांना एक स्पष्ट संदेश दिलाय. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान भाजपचे सर्वात मोठे नेते आहेत आणि गेल्या दोन दशकांपासून भाजप सत्ताकाळात मुख्यमंत्रीपदाचं पदही त्यांच्याच हातात आहे. परंतु, नुकतंच जबलपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी शिवराज यांच्या उपस्थितीत भाजप खासदार राकेश सिंह यांचं कौतुक केलं होतं. यानंतर मुख्यमंत्री शिवराज यांची झोपच उडालीय.
राज्यपालांचीही घेतली भेट
उल्लेखनीय म्हणजे या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ सप्टेंबर रोजी शिवराज सिंह चौहान यांनी राज्याचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांचीही भेट घेतली होती. काँग्रेस नेत्यांनी ही भेट 'असामान्य' असल्याचं म्हटलंय.
प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न?
यानंतर, मुख्यमंत्री शिवराज आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न गेल्या काही दिवसांत नागरिकांना पडला असेल. बैठकांचा सपाटाच मुख्यमंत्र्यांनी लावलेला दिसून येतोय. अतिशय खुलेपणानं ते नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत... यासाठी कधी ते मध्य प्रदेशातील आदिवासी नागरिकांना हेलिकॉप्टर राईड घडवून आणताना दिसले... तर कधी मंचावरूनच अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देताना... नुकतंच 'पीएम आवास योजने'तील काही त्रुटी लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात भर मंचावरून दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते.
मामा, तंगी सुरू आहे उधार घेऊ का?'
असाच त्यांचा एक खुला अंदाज मंगळवारी खंडवामध्ये झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमातही दिसून आला. या कार्यक्रमात त्यांनी 'राज्य सरकारलाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे' असं सांगतानाच 'उधार घेऊ का?' असा प्रश्न उपस्थितांना विचारला. मंगळवारी जनदर्शन कार्यक्रमासाठी शिवराज खंडवा भागात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी एका सार्वजनिक सभेलाही संबोधित केलं. करोनाकाळात सरकारच्या उत्पन्नावर होत असलेल्या परिणामाची चर्चा करताना 'तंगी आहे, उधार घेऊ का? नंतर पैसे परत देतो' असं म्हणत त्यांनी उपस्थितांना साद घातली. यावर, उपस्थितांनी हसत त्याला प्रतिसाद दिला.
'सरकारकडे पैशांची कमतरता आहे, यात कोणतीही शंका नाही. करोना संकट काळात सरकारचं उत्पन्न वाढलेलं नाही. १६ महिन्यांत ८ महिने दुष्काळात निघून गेले, कारण कराचा पैसाच गोळा झाला नाही. मामाही तंगीच्या परिस्थितीत आहे. परंतु, आम्ही ठरवलंय की उधार घ्यावे लागले तरी चालेल पण सर्व आवश्यक ती कामं निश्चित पूर्ण करू... उधार घेऊ, अरे उधार घेऊ का?', असं यावेळी शिवराज यांनी मंचावरून म्हटलं.
यावेळी, उधारीवरून काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला प्रत्यूत्तर देताना त्यांनी म्हटलं, 'काँग्रेसवाले ओरडत आहेत उधार घेतलं म्हणून आता घेतलं तर घेतलं, जनतेकडूनच तर घेतलेत'... मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतरही उपस्थितांनी त्यांना हसून प्रतिसाद दिला.
No comments:
Post a Comment