लातुरात पावसाचा हाहा:कार! - latur saptrang

Breaking

Wednesday, September 8, 2021

लातुरात पावसाचा हाहा:कार!



 लातूर : लातूर जिल्ह्यात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. औसा, जळकोट, चाकूर, अहमदपूर, लातूर निलंगा, रेणापूर, देवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह देवणी तालुक्यातील विजयनगर इथे वीज पडून बालाजी बोरुळे या ३५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर, रेणापूर तालुक्यातील रेणा नदीवरील रेणापूर, घनसरगाव, खरोळा या बंधाऱ्याचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील रेना, तावरजा, मांजरा, तेरणा, मन्याड सह सर्वच नद्यांना पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे जिल्ह्यातील रेना, तेरणा, मांजरा आदी नद्यांच्या बंधाऱ्यावरील दरवाजे उघडले आहेत त्यामुळे नदी काठच्या गावांनाही सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या खळाळून वाहू लागल्या आहेत. देवणी तालुक्यातील देवा नदीला पूर आला असून देवणी तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा नदीवरील बॅरेजेबंधाऱ्याचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

औसा तालुक्यातील उजनी येथील तेरणा नदीचे पाणी शेत शिवारात घुसून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. तर, जळकोट तालुक्यातील वांजरवाडा व परिसरातील होकर्णा, उमरदरा, वडगाव, सोरगा, शेलदरा, चेरा, धामणगाव, उमरगा रेतू, हावरगा, डोमगाव, जिरगा, ढोरसांगवी गावात काल पासून ढगफूटी झाली आहे. रात्री पासून याठिकाणी मोठा पाऊस चालू असून नदी-नाल्यास पूर आला आहे. हातातोंडाशी आलेले उशिरा आणि दूबार पेरणी केलेले मूग, उडिदाला पावसामुळे जाग्यावरच मोड फूटू लागले आहेत.

प्रशासनाने पाऊस उघडताच तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानूसार पुढील १-२ दिवस असाच पाऊस सुरु राहणार असून शेतकरी बांधवानी नागरिकांनी स्वत:ची व परिवाराची काळजी घेऊन घरीच राहण्याची सूचना केली आहे. बेफिकिरपणे नदी-नाले, ओढयातून जाऊ अथवा येऊ नये जमिन व रस्त्यावरील पूल खचून वाहून जाण्याची भिती आहे. पाण्याचा अंदाज कळत नाही त्यामुळे जिवितहानी होऊ शकते असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


नांदेडमध्ये पावसाचं रौद्ररुप, वाहून गेलेल्या पिता-पुत्राचे मृतदेह अखेर सापडले

No comments:

Post a Comment