मुंबई, 24 सप्टेंबर : कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून शाळा बंद होत्या. अखेर 4 ऑक्टोबरपासून शाळा (Maharashtra school reopen from 4 October) सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण, 'विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील शाळा अखेर सुरू (Maharashtra School reopen) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता मिळाली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वर्षा गायकवाड यांनी संपूर्ण नियमावली वाचून दाखवली आहे.
कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करत आहोत. पालकांच्या संमतीशिवाय बालक शाळेत येऊ नये. निवासी शाळांसाठी हा निर्णय नाही. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी लसीकरण करावं याकडे लक्ष असेल, यासाठी 8 दिवसांचा कालावधी आहे, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
पालकांसाठी सूचना देत आहोत की, आपल्या पाल्याला युनिफॉर्म घालणे, घरी येऊन काळजी घेण्याची पूर्ण खबरदारी घ्यायची आहे. पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असंही गायकवाड यांनी सांगितलं,
आजारी विद्यार्थी कसा शोधावा याची माहिती शिक्षकांना दिली आहे. त्यानुसार, शाळेत सुद्धा योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे, असंही गायकवाड म्हणाल्या.
मुंबई लोकल प्रवास हा दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तींना सुरू आहे. स्थानिक पातळीवर शिक्षकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी आयुक्तांनी निर्णय घ्यायचा आहे. म्हणून शहरी भागात आयुक्तांना यात समावेश केला, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
यापूर्वीही राज्यातील शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील जवळपास सर्वच सेवा, व्यवहार सुरळीत सुरू आहेत. केवळ शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यावर आता मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे.
No comments:
Post a Comment