जळगाव जिल्ह्यातील साकेगाव-कंडारी गटातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन भूमीपूजन - latur saptrang

Breaking

Monday, September 13, 2021

जळगाव जिल्ह्यातील साकेगाव-कंडारी गटातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन भूमीपूजन

मुंबई, दि. 13 : खान्देशातला जळगाव जिल्हा हा तापी नदीच्या खोऱ्यामुळे समृद्ध आणि संपन्न असलेला प्रदेश आहे. इथली नुसती मातीच सुपीक नाही, तर इथले विचार सद्धा समृद्ध आहेत. सातपुडा पर्वतरांगेप्रमाणे इथले लोक सुद्धा कणखर, स्वाभिमानी आहेत. या स्वाभिमानी जनतेच्या विकासासाठी तसेच जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातील साकेगाव-कंडारी गटातील विविध विकासकामांचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निलेश लंके, आमदार अमोल मिटकरी, माजी मंत्री एकनाथ खडसे (व्हिसीद्वारे), जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप सोनावणे, अरुण पाटील, अविनाश आदिक, ॲड. रविंद्रभैय्या पाटील, जे.डी. बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, सचिन पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, साकेगाव-कंडारी जिल्हा परिषद गटासह, संपूर्ण जळगाव जिल्ह्यात विकासाची प्रक्रिया अशीच सुरु राहील. भविष्यात विकासाची प्रक्रिया अधिक वेग घेईल. विकासकामाला निधी कमी पडणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. जळगाव जिल्ह्याच्या विकासाचे प्रत्येक काम मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल. गेल्याच आठवड्यात जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातल्या वरणगांव-तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आले. ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आल्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या बोधवड, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यातल्या 52 गावांना लाभ होणार आहे. ओझरखेड धरणात पाणी सोडत योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला, ही कामाची सुरुवात आहे, जळगाव जिल्ह्याच्या विकासाची सर्व कामे मार्गी लावायची आहेत.

विकासकामे ही सर्वसामान्य जनतेच्या पैशातून उभी राहत असतात. त्यामुळे प्रत्येक काम दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचे झाले पाहिजे, अशी सूचना उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केली. कामाचा दर्जा, वेळेचे नियोजन, उपयोगितेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करु नये. विकासकामांच्या बाबतीत कोणत्याही परिस्थितीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. दिलेल्या वेळेत ही कामे पूर्ण व्हावीत, ती दर्जेदार व्हावीत, ही जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोरोनाचे संकट हे वैश्विक संकट आहे, संपूर्ण जगावरच आलेले हे संकट आहे. त्यामुळे हे संपूर्ण मानवतेवर आलेले हे संकट आहे. त्याचा मुकाबला आपण सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे. कोरोनाचे नियम पाळून आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.

यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अमोल मिटकरी, आमदार निलेश लंके यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी केले.

*****



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3hrHPSz
https://ift.tt/3z2y0QJ

No comments:

Post a Comment