नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश - latur saptrang

Breaking

Tuesday, September 21, 2021

नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

मुंबई, दि. 21 : नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची कामे सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तात्काळ पूर्ण करावीत, टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण केली नाही तर संबधित यंत्रणेवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री  तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

पालकमंत्री श्री.छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोलप्लाझा या रस्त्याची दुरावस्था, वाहतूक कोंडीच्या उपाययोजनांबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माजी खासदार समीर भुजबळ, माजी विधानपरिषद सदस्य जयवंतराव जाधव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अतिरिक्त महानगर आयुक्त के.गोविंदराज, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक व ठाणेचे सचिव अन्शुमली श्रीवास्तव, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नाशिकचे जनरल मॅनेजर एम.के.वाठोरे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता आर.ए.डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिकचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनावणे, ठाणे महामार्ग सुरक्षा पथकाचे, ठाणे पोलीस उपायुक्त वाहतूकचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून निकृष्ट रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. टोल नाक्यांची कामे करताना सर्व रस्ते वाहतूक तसेच कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्या कामांत समन्वय ठेवावा. पावसामुळेदेखील या रस्त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझा या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची स्वत: पाहणी करावी व कामांना तात्काळ गती द्यावी.

यावेळी समीर भुजबळ म्हणाले, मुलुंड टोल नाक्यापासून वाहतूक कोंडी होत आहे. या कार्यक्षेत्रातील रस्तेविकास यंत्रणांनी याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पाहणी करावी. जेणेकरून नागरिकांचा रोष आहे तो लक्षात येईल. वारंवार खराब होणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे. जेणेकरून विनाअडथळा वाहतूक कोंडीशिवाय सुरळीत सुरू राहील. आगामी दहा वर्षात होणारे रस्ते तसेच या परिसरातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे नियोजन देखील सर्व रस्ते विकास यंत्रणांनी आत्तापासून करावे जेणेकरून या परिसरातून होणाऱ्या वाहतूकीचे नियोजन सुयोग्यरित्या करता येईल.

१५ ऑक्टोबरपर्यंत टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण करणार :- अन्शुमली श्रीवास्तव

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझाची कामे विहित वेळेत पूर्ण  करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच १५ ऑक्टोबरपर्यंत टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाही तर ह्या टोल नाक्याचे कंत्राट रद्द करण्यात येईल अशीही माहिती यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक व ठाणेचे सचिव अन्शुमली श्रीवास्तव यांनी दिले.

0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3Cz3TTa
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment