ठाणे, दि. १८ (जिमाका): लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवून त्यांना चांगले शिक्षण द्यावे. जेणेकरून जबाबदार नागरिक घडविण्याकामी त्याचा फायदा होईल. यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे झालेल्या कार्यक्रमात केले.
किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन, पदव्युत्तर शाखेचा शुभारंभ आणि महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीचा पायाभरणी समारंभ राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते झाला. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार दौलत दरोडा, माजी आमदार गोटीराम पवार, पांडूरंग बरोरा, व्हीपीएम संस्थेचे अध्यक्ष अरविंद भानुशाली आणि मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर व्यासपिठावर उपस्थित होते.
राज्यपाल श्री.कोश्यारी यावेळी म्हणाले, व्हीपीएम संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागामध्ये शिक्षणाचे चांगले काम सुरु असून शिक्षणसंस्थेच्या विधी महाविद्यालयामुळे या भागातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. समाजात लहानपणापासून विद्यार्थ्यांवर सदाचाराचे आणि शिष्टाचाराचे संस्कार झाले पाहिजे. चांगले चारित्र्य घडविण्यासाठी लहानपणापासून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समाजामध्ये महिलांविषयी आदराची भावना निर्माण करतानाच माता- भगिनी या आपला आधार असल्याचे सांगत राज्यपाल म्हणाले की, सामाजिक कार्यामध्ये महिलांना मोठ्या संख्येने सहभागी करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. क्षेत्र कुठलेही असो आजच्या घडीला मुलांपेक्षा मुलीच अग्रेसर असल्याचे कौतुकोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
दुर्गम भागामध्ये शिक्षणाची गंगा आणण्याचे काम- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये शिक्षणाची गंगा आणण्याचे काम या संस्थेमार्फत झाले असून, कोरोना काळात रोजगार निर्मिती बरोबरच गरजूंना धान्य वाटप करुन शिक्षणा सोबत समाजसेवेचा वसा जपल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यावेळी सांगितले. केंद्रीय पंचायत राज विभागाच्या माध्यमातून देशातील २ लाख ५५ हजार ग्रामपंचायती ॲपच्या माध्यमातून जोडण्यात येत असून प्रत्येक राज्यातील भाषेत हे ॲप असणार असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले. त्या माध्यमातून केंद्राच्या २३ योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून ग्रामीण भागातील जनतेला लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील १० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमात राष्ट्रीय छात्र सेना विषयाचा समावेश – मंत्री उदय सामंत
राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमात राष्ट्रीय छात्र सेना विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून भूमिका बजावल्याचे सांगत किन्हवली परिसरामध्ये कृषि महाविद्यालय होण्यासाठी सहकार्य करु असे त्यांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कोकण परिक्षेत्राचे उप महासंचालक संजय मोहिते, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि राष्ट्रपती शौर्यपदक विजेते शहापूरचे उपविभागीय अधीक्षक नवनाथ ढवळे यांचा राज्यपालांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद भानुशाली यांनी प्रास्ताविक केले. संस्थेमार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमास कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, संस्थेचे उपाध्यक्ष खंडू विशे, डॉ. सुनिल भानुशाली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुषमा हसबनीस यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने आणि समारोप वंदे मातरम् ने करण्यात आला.
दरम्यान, आज सकाळी राज्यपालांचे ठाणे शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त जग जित सिंह, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, राज्यपाल महोदयांचे खासगी सचिव उल्हास मुणगेकर, विशेष कार्य अधिकारी अमरेंद्र सिंह, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर आदी उपस्थित होते.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3nPeAgj
https://ift.tt/3hKsUmo
No comments:
Post a Comment