मुंबई दि. 23 : विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सदस्यांच्या वाहनास पथकरामध्ये फास्टॅगद्वारे सूट देण्यात यावी. विद्यमान सदस्यांची ऑनलाईन पद्धतीने फास्टॅगची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिवेशनादरम्यान शिबिराचे आयोजन करावे, अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी दिल्या.
विधानभवन येथे विद्यमान आमदार तसेच माजी आमदार यांना फास्टॅगद्वारे पथकरात सूट देण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी)चे मुख्य महाप्रबंधक कमलाकर फंड, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्ही. बी. राव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव राजेंद्र जवंजाळ, सभापतींचे सचिव महेंद्र काज आदींसह अधिकारी उपस्थित होते.
विद्यमान आमदार, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्र व राज्यशासनाची वाहने याचबरोबर विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांना पथकर शुल्क आकारणीमध्ये सूट देण्यात येते. मात्र, फास्टॅग लागू झाल्यानंतर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमदारांना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने सहकार्य करावे असे सभापती यांनी सांगितले.
माजी आमदारांना फास्टॅगद्वारे पथकरात सूट मिळण्यासाठी संबंधितांकडून प्रस्ताव आल्यास, केंद्र शासनास तशी विनंती करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असेही सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
विद्यमान तसेच माजी आमदारांसोबत पथकर नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागण्याच्या सूचना संबंधित विभागाने त्यांना देण्यात याव्यात, असेही सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3CCVAWz
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment