मोफत शिवभोजन थाळी होतेय बंद! १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार पैसे - latur saptrang

Breaking

Wednesday, September 29, 2021

मोफत शिवभोजन थाळी होतेय बंद! १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार पैसे




 मुंबई: करोनाच्या संकटानंतर करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले. या संकटामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे आणि कामगारांचे हाल सुरू झाले होते. अशा गरजूंसाठी राज्य सरकारने मोफत शिवभोजन थाळी सुरू केली होती. आता करोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्यानंतर शासनाने निर्बंध हळूहळू कमी केले आहेत. त्यानंतर आता शासनाने शिवभोजन थाळी मोफत देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या निर्णयानुसार गरीब आणि गरजूंना शिवभोजन केंद्रांवर ३० सप्टेंबरनंतर मोफत शिवभोजन थाळी मिळू शकणार नाही. (free shivbhojan thali is closing now you have to pay for shivbhojan thali from 1st october)


शासनाच्या निर्णयानुसार, आता १ ऑक्टोबरपासून ग्राहकांना शिवभोजन थाळीसाठी पूर्वीप्रमाणे प्रति प्लेट १० रुपये द्यावे लागणार आहेत. मंगळवारी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार शिवभोजन थाळीची पार्सल सुविधा देखील शिवभोजन केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. १ ऑक्टोबरपासून शिवभोजन केंद्रांना दररोज दीडपट थाळी वाटप करण्याचे उद्दिष्ट आता राहणार नाही.

कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात २९ मार्च २०२० रोजी शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपये प्रति थाळी करण्यात आली. त्यानंतर कोरोनाचे संकट वाढल्यानंतर १५ एप्रिल २०२१ पासून ब्रेक द चेन अंतर्गत गरीब आणि गरजूंना प्रतिदिन २ लाख शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत होती. खरे तर शासन निर्णयानुसार शिवभोजन थाळीच्या मोफत वितरणाचा कालावधी या १४ सप्टेंबर रोजीच संपलेला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधही आता टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. हे पाहता शिवभोजन थाळीचा दर पूर्वीप्रमाणे १० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिवसभर राज्यातील १ हजार ३२० शिवभोजन केंद्रांवर १ लाख ९० हजार २३० शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले आहे. तर सोमवारी गरजूंना १ लाख ९२ हजार ४१५ शिवभोजन थाळ्या मोफत देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment