कोरडवाहू शेती क्षेत्रात बदलत्या हवामानानुसार संशोधन व शिक्षणप्रणाली राबविण्यात यावी – कृषिमंत्री दादाजी भुसे - latur saptrang

Breaking

Tuesday, September 28, 2021

कोरडवाहू शेती क्षेत्रात बदलत्या हवामानानुसार संशोधन व शिक्षणप्रणाली राबविण्यात यावी – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई दि. 28 : सद्यस्थितीत कोरडवाहू शेती क्षेत्रात बदलत्या हवामानानुसार संशोधन करावे व त्यानुसार शिक्षणप्रणाली राबविण्याची गरज आहे, त्यादृष्टीने हवामान बदलानुसार पीक पद्धती, मशागत तंत्रज्ञान, नवीन वाणांची सुधारणा याविषयी संशोधन व विस्तार शिक्षण हाती घेण्यात यावे, असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य कृषि परिषदेची 105वी बैठक मंत्री कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली.त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश अबीटकर, चारही कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले (अकोला), डॉ.अशोक ढवण (परभणी), डॉ. संजय सावंत (दापोली). डॉ. प्रशांत पाटील (राहुरी), कृषि परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, सदस्य डॉ. कृष्णा लव्हेकर, शिक्षण संचालक डॉ. हरीहर कौसडीकर व अन्य सदस्य उपस्थित होते.

कृषि विद्यापीठातील उपलब्ध सर्व साधनसामुग्रीचा आढावा घेऊन त्यानुसार त्याचा वापर प्रभावीपणे करण्यावर भर द्यावा. कृषि विद्यापीठांनी विद्यार्थीनींसाठी वसतीगृह बांधकामासाठी सीएसआर सारखे इतर निधी उपलब्ध करून कार्यवाही करावी, असे निर्देशही श्री.भुसे यांनी दिले. कृषि अभ्यासक्रमात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करणे तसेच जटील समस्यांचे संशोधनासाठी विषय सूचविणे याबाबत  कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुंनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही श्री.भुसे यांनी यावेळी केले.

कृषि विद्यापीठ व केंद्र शासनाच्या विविध पिकांच्या संशोधन केंद्रांचे संशोधन कार्य प्रभावीपणे शेतकऱ्यांच्या उपयोगी पडेल या दृष्टीने विस्तार कार्य हाती घेणे गरजेचे आहे. या संदर्भात सोलापूर व नाशिक जिल्ह्यातील डाळींब पिकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या गंभीर समस्यासंदर्भात राहुरी कृषि विद्यापीठाने भरीव कार्य करण्याची आवश्यकताही कृषीमंत्र्यांनी  यावेळी व्यक्त केली.

कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी कृषि विद्यापीठे व कृषि महाविद्यालये यांची भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे मानके सिद्ध करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

कृषि परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश अबीटकर यांनी कृषि विद्यापीठाकडील प्रलंबित विषयासंदर्भात परिषदेकडे पाठपुरावा करून गतीने कामकाज करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

कृषि विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत विद्यार्थी हिताच्या दृष्टीने 2018-19 बॅच पदविकाधारक विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश देण्याबाबत मान्यता देण्यात आली. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तीन वर्षे इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम मांजरी फार्म पुणे, परभणी व कष्टी ता. मालेगांव येथे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2XYPMrV
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment