लातूर (जफर शेख ):- कोरोना प्रादूभावाच्या ठीण काळात महाविकास आघाडी सरकार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कार्याची जगाने नोंद घेतली आहे. सरकारने जनसामान्यांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून कोणतेही चुकीचे पाऊल उचलले नाही तर जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देऊन कोरोना काळात कार्य केले असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
लातूर येथे डॉ. मनोज देशमुख व सहकाऱ्यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा मॉडर्न इमेजिंग सेंटरचा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज शुक्रवार दि. 15 ऑक्टोबर रोजी विजयादशमी चे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आले.
या नव्या व्यवस्थेमुळे नेमक्या व्याधीचे लवकरात लवकर निदान होऊन रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे, शिवाय त्यासाठीच्या खर्चातही बचत होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचाराचे केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या लातूरसाठी हे नवे दालन उपलब्धी ठरेल अशा शुभेच्छा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या.
यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, लातूरच्या आयएमए अध्यक्ष सुरेखा काळे, डॉ.दयानंद मोटेगावकर, डॉ. मनोज देशमुख,डॉ.राहुल रनखांब, डॉ.संदीप कदम, डॉ.तानाजी माने, ओमप्रकाश मोतीपोवळे, चंद्रकांत सातपुते आदींसह डॉक्टर, नागरिक उपस्थित होते.
या मॉडर्न इमेजिंग सेंटरमध्ये सिटीस्कॅन, इमेजिंग, सोनोग्राफी एक्स-रे, कलर डॉपलर आदी आधुनिक दर्जाच्या सुविधा डॉक्टर मनोज देशमुख यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये देण्यात येणार आहेत. यावेळी पालकमंत्री ना. देशमुख यांनी इमेजिंग सेंटरची पाहणी केली माहिती घेतली.
यावेळी बोलतांना पालकमंत्री देशमुख म्हणाले की कोरोना महामारीची कोणालाच कल्पना नव्हती.
सुरुवातीला पुणे, सोलापूर या ठिकाणी तपासणीसाठी जावे लागायचे. पण आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रयोगशाळा विक्रमी काळात सुरू केली. आता सध्या राज्यात 1000 लॅबोरेटरी खाजगी व शासकीय यंत्रणांनी उभ्या केल्या आहेत. राज्याचे आरोग्य स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत आहे. या कठीण काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कार्याची जगाने नोंद घेतली. देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्रीयामध्ये त्यांची गणना झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने जनसामान्यांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून कोणतेही चुकीचे पाऊल उचलले नाही. पुढे बोलताना पालकमंत्री देशमुख म्हणाले की, लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातुरात सुरू केले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते सुरू झाले शासकीय महाविद्यालयाने अडचणीच्या काळात सर्व नागरिकांना सोयी सुविधा दिल्यात महाविद्यालयातील त्या सर्व विद्यार्थी डॉक्टर यांचे कौतुक आहे. महाविकास आघाडी सरकारने निवासी डॉक्टरांनी सेवा दिली म्हणून त्यांना ओंनरियन मंजूर केले आहे. आपण केलेल्या सुविधेमुळे तिसऱ्या लाटेला आपण सज्ज आहोत. या लाटेला तोंड देण्यासाठी महानगरपालिकेने शतप्रतिशत लसीकरण करावे, त्यांना लसीची कमतरता पडू देणार नाही. लातूर जागृत शहर आहे. प्रत्येक रुग्णालयात क्लिनिक व सर्व ठिकाणी लसीकरण करावे, मनपाने लसीकरण कॅम्पेन व सामाजिक कार्यकर्त्यांनी लसीकरण कॅम्प घ्यावे अशा सूचनाही त्यांनी केल्या. ते म्हणाले की तिसरी लाट येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे जगात असे सिद्ध झाले आहे की जेवढे जास्त लसीकरण केले जाते त्या ठिकाणी कोरोना वाढत नाही. जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. मेडिकल प्रोटोकॉलमध्ये आता जागरूकता आलेली आहे. रोग लवकर कळला तर तो लवकर बरा करता येतो. हेल्थ अवरनेससाठी हे सेंटर उपयोगाला येईल महाराष्ट्राला याची गरज आहे. दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र सरकारने सर्व आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. वैद्यकीय क्षेत्राला खाजगी लोकांकडून गुंतवणूक करून जनतेला अधिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लातूर हे डॉक्टरांचे शहर आहे नीट मध्ये हजार ते दीड हजार लातूरचे यशस्वी विद्यार्थी असतात. या डायग्नोस्टिक सेंटर मध्ये वीस डॉक्टर सहभागी आहेत. लातुरात सुपरस्पेशालीटी उभी राहावी, मुंबई दिल्ली, हैदराबाद, इंग्लंड, येथे जाण्याची गरज भासू नये. लातुरात एक नवीन डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून सेवा सुरू होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित सर्वांना दसऱ्याच्या व येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment