लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लोकशाही भोंडला स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन - latur saptrang

Breaking

Tuesday, October 5, 2021

लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लोकशाही भोंडला स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. 5 : निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र, या उत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे भोंडला गीते. लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने लोकशाही भोंडला ही स्पर्धा आयोजित केली आहे. आजची स्त्री ही स्वतंत्र व्यक्तीमत्वाची असून, तीने लोकप्रतिनिधी निवडताना लोकशाही मुल्यांना प्रमाण मानून आणि देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा या आशयाच्या भोंडला गीतांची  ध्वनीचित्रफित स्पर्धकांनी ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या काळात पाठविण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

लोकशाही मुल्यांचा प्रचार आणि प्रसार या भोंडल्याच्या माध्यमातून व्हावा यासाठी लोकशाही भोंडला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेसाठीचा अर्ज https://forms.gle/G8TSjHyFN9hzatzH9  या लिंकवर उपलब्ध असून, यावर ध्वनिचित्रफित स्पर्धकांनी पाठवावी. या स्पर्धेत एकल (Solo) किंवा समूह दोन्ही प्रकारची गीते पाठवता येतील. एक समूह गीते पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरावा व एकच गीत पाठवावे. गीताची ध्‍वनिचित्रफित किमान दोन तर कमाल चार मिनीटे कालमर्यादा असून, आकार ३०० एमबी आणि एमपी४ या फॉरमॅटमध्ये असावी.  स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून संपर्क साधावा.

भोंडलामध्ये ज्याप्रमाणे सुनेचे सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे माहेरी जाण्याचं स्वप्न लांबणीवर पडतं. त्याच प्रकारे आधुनिक स्त्रीला  कुटूंबातील आणि नोकरीतील जबाबदाऱ्यांमुळे तिची मतदार म्हणून नाव नोंदणी किंवा लग्नानंतर झालेल्या नावात बदल करणे, यांसारख्या कामांत चालढकल करावी लागते. या गीतांच्या माध्यमांतून तिला प्रेरित करणाऱ्या गीतरचना करता येतील.

लोकगीतांच्या अंगभूत लवचिक स्वरूपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचं मानस गुंफणंही सहज शक्य आहे आणि हे मानस गुंफताना तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसं व्हावं, हे सांगता येईल. आजची स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहे, निर्णयक्षम आहे; हे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयाने, लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून गावाच्या-देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा, असे आवाहन करता येईल, अशी माहितीही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक ११ हजार रोख, तर द्वितीय आणि तृतीय अनुक्रमे ७ हजार आणि ५ हजार रूपये रोख देण्यात येणार आहे. तर उत्तेजनार्थ १००० रूपयांची दहा बक्षीसे देण्यात येणार आहेत.

या विषयाशी संबंधित साहित्य पाठवणाऱ्या सहभागी सर्व स्पर्धकांना (समूह गीतात सहभागी प्रत्येकाला)  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, विजेत्यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. आलेल्या भोंडला गीतांतून सर्वोत्तम गीते निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल. अशी माहितीही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3owJt9B
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment