शिवसेना म्हणते, "हा स्वातंत्र्याचा 'रक्त महोत्सव' म्हणायचा का?" - latur saptrang

Breaking

Wednesday, October 6, 2021

शिवसेना म्हणते, "हा स्वातंत्र्याचा 'रक्त महोत्सव' म्हणायचा का?"



लखीमपूर-खेरी हिंसाचारावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यावरून शिवसेना पक्षानेही काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची बाजू घेत भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. “शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आता तरी दोन अश्रू ढाळा! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?”, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

शिवसेना काय म्हणते…

“प्रियांका गांधी यांना अखेर योगी सरकारने अटक केली. मागील ३६ तासांपासून त्यांना सीतापूरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. चिरडून मारलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास त्यांना भेटायचे होते. प्रशासनाने प्रियांका यांना नुसतेच रोखले नाही, तर त्या मुलीस धक्काबुक्की करून गाडीत कोंबले. प्रियांका गांधी या झुंजार आणि लढाऊ आहेत. त्यां गप्प बसल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यांत आणि आवाजात इंदिरा गांधींची धार आहे. त्यांनी सीतापूरच्या तुरुंगात त्यांनी संघर्ष सुरुच ठेवला आहे.”

“उत्तर प्रदेशातील शेतकरी हत्याकांडाचे पडसाद जगभर उमटले आहेत. सरकारनेही कोणाचेही, कसेही मुडदे पाडायचे व विरोधकांनी त्यावर आवाज उठवला तर त्यांचे गळे आवळाचे. ज्यांना मारले त्यांच्या नातेवाईकांनी अश्रू ढाळले, हुंदके दिले, तर त्या नातेवाईकांवरही उद्या सरकार उलथविण्याचे कट रचले म्हणून खटले दाखल केले जातील,  अशी टीका भाजपवर शिवसेनेने केली आहे.

तर भाजपची महिला फौज फुगड्या घालत रस्त्यावर उतरली असती

“लखीमपूर-खेरीत केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांचे हत्याकांड घडवले. त्या मंत्रीपुत्रास वाचवण्याचे प्रयत्न योगींच्या पोलिसांनी केले. ‘तो मी नव्हेच, मी तेथे नव्हतोच’, असा आव मंत्रीपुत्राने आणला. पण, आता शेतकऱ्यांवर घुसवलेल्या गाडीचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे सरकार काय करणार? हे प्रकरण पं. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने देशभर आंदोलन पुकारले असते. प्रियांका गांधींना ज्या प्रमाणे अपमानित करून धक्के मारले हे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडले असते, तर महाराष्ट्रातील भाजपची महिला फौज फुगड्या घालत रस्त्यावर उतरली असती”, असा टोमणाही शिवसेना पक्षाने भाजपला लगावला आहे.

आणीबाणीतही लोकशाहीचा असा गळा घोटला नव्हता

“महिलांवरील अत्याचाराची स्वतंत्र व्याख्या भाजपने केली असून त्या व्याख्येत इंदिरा गांधींच्या नातीवर झालेला हल्ला बसत नाही. लखीमपूर खेरीत जाण्यापासून छत्तीसगढ, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही योगी सरकारने रोखले आहे. हे काय हिंदुस्तान-पाकिस्तान युद्ध सुरू आहे काय? आपल्याच देशातील दोन मुख्यमंत्र्यांना लखनऊमध्ये उतरण्यापासून रोखले जाते. हा संघराज्यातील विचित्र प्रकार घडला आहे. लोकशाहीचा असा गळा आणीबाणीच्या काळातही कधी घोटला नव्हता”, अस सडतोड मत शिवसेना पक्षाने मांडलं आहे.

शेतकऱ्यांवर गाडी घालणारा केंद्रीय मंत्र्याचा पूत्र

“लखीमपूरची लढाई राजकीय नसून जगभरातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्काची बनली आहे. ब्रिटिश काळात लाला लजपतराय हे शेतकऱ्यांचे नेते ब्रिटिश जुलुमाविरुद्ध रस्त्यावर उरतले. त्यांच्यावर निर्घृण हल्ला ब्रिटिशांनी केला. त्यातच लालाजींचा मृत्यू झाला. जालियनवाला बागेत शेतकऱ्यांवर गोळ्या चालवणारा जनरल डायर ब्रिटिश होता. मुंबईत परदेशी कापडाविरोधात आंदोलन करणाऱ्या बाबू गेनूच्या अंगावरून ट्रक नेमाराही ब्रिटिश होता. पण, लखीमपूरात हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घालणारा स्वतंत्र हिंदुस्तानातील केंद्रीय मंत्र्याचा पूत्र आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हे सर्व घडले आहे.”

गांधीजींचे आंदोलन विसरू नका

शेतकऱ्यांना काय हवे? तीन कृषी कायद्यांवर फेरविचार व्हावा असे त्यांना वाटते. पण, सरकार एेकायला तयार नाही. केंद्र सरकारला शेतीचे खासगीकरण करून मर्जीतल्या उद्योगपतींना देशातील शेतजमीन द्यायची आहे. सर्व सरकारी संपत्ती खासगी लोकांना विकून टाकल्यावर आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे. त्या मनमानीविरोधात शेतकरी उभा टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे एेकायला हवे. कायदे हे जनतेसाठी केले जातात. जनता कायद्यासाठी जन्माला येत नाही. कायदे मोडून, कायदेभंग करूनच गांधीजींनी स्वातंत्र्याचे आंदोलन पेटविले हे विसरू नका.

No comments:

Post a Comment