सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार - latur saptrang

Breaking

Thursday, October 7, 2021

सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 7 : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सिंदखेडराजा तसेच राज्यातील इतर पर्यटनस्थळ विकासासाठी अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पर्यटनस्थळ विकासासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीला पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, माजी नगराध्यक्ष ॲड. नजीर काझी यांच्यासह भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी तसेच संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी अशी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केलेली विनंती दोघांनीही मान्य केली.

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या स्थळाला  ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इथे 16 पर्यटनस्थळे आहेत त्यापैकी पाच स्थळे केंद्राच्या अखत्यारितील पुरातत्व विभागाकडे आहेत.  शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेर म्हणून हे स्थळ ओळखले जाते. याशिवाय हिंदूराजे लखोजी राव यांचा राजवाडा, रंगमहाल, निळकंठेश्वर मंदिर यासाख्या स्थळांमुळे अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात.

औरंगाबाद जिल्ह्यातील अजंठा, एलोरा, दौलताबाद, व  इतर पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला. पर्यटन विकासासह वारसा जतन करण्यासाठी लागणारे सहकार्य भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला करण्यात येईल यासंदर्भात राज्याचे सहकार्य मिळेल, अशी ग्वाही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/300pHZX
https://ift.tt/3Aq5sRP

No comments:

Post a Comment