मुंबई, दि. 10 : नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन व बुद्धीने एकत्र येणे आवश्यक असून अल्पसंख्याक सर्वधर्मिय नेत्यांनी, धर्मगुरूंनी केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याकांसाठीच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांचा समान न्याय, शिक्षण व रोजगाराचा पाया मजबूत करावा, असे आवाहन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंह लालपुरा यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे विविध धर्मियांच्या प्रतिनिधिंसोबत आयोजित बैठकीत श्री. लालपुरा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जगन्नाथ अभ्यंकर, अल्पसंख्याक विकास विभागाचे सहसचिव एस.सी.तडवी, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सचिव एस.वाय. बर्वे उपस्थित होते.
श्री. लालपुरा म्हणाले, आपला देश विविधतेने नटलेला असून तीच आपली खरी ताकद आहे, देशातील सर्व धर्म व समाजांचा विकास व्हायला हवा. हा विकास शिक्षण, रोजगार व समान न्याय या त्रिसूत्रितूनच साधला जावू शकतो. त्यामुळे धर्माचा वापर राजकारण करण्यासाठी न होता तो आपल्या धर्मातील, समाजातील गरजू व्यक्तींना, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्हावा. विविध योजनांची माहिती नागरिकांना आपल्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विविध धर्मातील समस्या समजून घेता याव्यात, त्यावर चर्चा करून तोडगा काढता यावा, यासाठी लवकरच आंतरधर्मिय समन्वय समिती (इंटर रिलिजन कोऑर्डिनेशन कमिटी)ची स्थापना करण्याचे विचाराधीन असल्याचेही श्री.लालपुरा यांनी सांगितले. समाजात सदैव प्रेम, बंधुभाव वाढत राहावा यासाठी हा आयोग काम करत आहे. सर्वधर्मिय प्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचनांचे अल्पसंख्याक आयोग नेहमीच स्वागत करेल, असेही त्यांनी नमूद केले.
‘अल्पसंख्याक नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोग सदैव तत्पर असून त्यासाठी पुढाकार घेतला जात आहे’ असे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जगन्नाथ अभ्यंकर यांनी सांगितले. दरम्यान राज्य शासनाचे अल्पसंख्याकांच्या कल्याणाबाबतचे 147 प्रस्ताव केंद्र शासनाकडे दाखल असून त्यासाठी त्वरेने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती श्री.अभ्यंकर यांनी केंद्रीय आयोगाला केली.
उपस्थित सर्वधर्मिय प्रतिधींनी आपल्या समाजातील विविध प्रश्न समोर मांडून त्यावर तोडगा काढण्याची विनंती आयोगाला केली. यासर्व बाबींचा सारासार विचार करून आवश्यक ती पावले उचलली जातील अशी ग्वाही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंग लालपुरा यांनी यावेळी दिली. दरम्यान सर्व धर्मियांनी इतर धर्मांचाही अभ्यास करून राजकारणाला दूर ठेवून सत्याची कास धरत जनजागृती करण्यावर भर द्यावा, ज्ञानाचा व शासकीय योजनांचा प्रसार तळागाळातील नागरिकांपर्यत करावा, असे आवाहनही श्री.लालपुरा यांनी यावेळी केले.
या सर्वधर्मिय बैठकीत विविध अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यामध्ये दिनशॉ मेहता, भरत बाफना, विरेंद्र शहा, महेंद्र कांबळे, मौलाना सय्यद अतहर अली, मौलाना महमूद दर्याबादी, प्रकाश चोप्रा, राकेश जैन, हिरालाल मेहता, श्री. गुरू सिंह सभा संस्थेचे रघबीर सिंह गील, कुलवंत सिंह आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3Aw3vDD
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment