परीक्षेसाठी तयारी पूर्ण, देखरेखीसाठी अधिकारी नियुक्त आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांची माहिती - latur saptrang

Breaking

Friday, October 29, 2021

परीक्षेसाठी तयारी पूर्ण, देखरेखीसाठी अधिकारी नियुक्त आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांची माहिती

मुंबई, दि. 29 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या गट ड संवर्गातील लेखी परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी आज दिली.

आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी येत्या रविवारी, ३१ ऑक्टोबर २०२१ परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्याबाबत डॉ. पाटील यांनी आज माहिती दिली.

राज्यातील ४२ संवर्गातील ३४६२ पदांसाठी परीक्षा

त्यांनी सांगितले की, गट ड संवर्गातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालयातील ४२ संवर्गातील ७८ कार्यालयातील ३४६२ पदे भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता ४,६१,४९७ उमेदवारांचे अर्ज प्राप्त असून १३६४ केंद्रांवर परीक्षा आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील ३.६२ लाखांवर उमेदवारांनी घेतले प्रवेशपत्र

आतापर्यंत ३.६२ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेतले आहे. गट ड संवर्गातील परीक्षा एकाच सत्रात होणार आहे. उमेदवारांनी त्यांना दिलेल्या प्रवेश पत्रानुसार नियोजन करावे. काही शंका असल्यास 9513315535, 7292013550 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

क संवर्गातील परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध

दरम्यान, गट क संवर्गातील पदांच्या भरतीसाठी झालेल्या परीक्षेची उत्तरतालिका ( Answer Key) प्रसिद्ध केली आहे. याबाबत काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी www.arogya.maharashtra.gov.in किंवा arogyabharati2021.in या संकेतस्थळावर आवश्यक पुराव्यानिशी नोंदवावेत, असे आवाहन डॉ. अर्चना पाटील यांनी केले आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3jNXf4E
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment