ठाणे, दि.१ (जिमाका) : डोंबिवलीच्या घटनेचा पोलिसांकडून योग्यरितीने तपास सुरू असून सर्वच संशयितांना अटक करण्यात आली आहे. लवकरात लवकर चार्टशीट दाखल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून या घटनेतील पीडितेला न्याय नक्की मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कल्याण येथे व्यक्त केला.
डोंबिवलीतील घटनेतील पीडितेची आणि तिच्या कुटुंबियांची उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज भेट घेत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे आदी उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मी आज पीडिता आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला. येणाऱ्या काळात या कुटुंबाला समाजातून सहकार्य मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगताना या प्रकरणात पोलिसांनी वेगाने कारवाई करीत संशयिताना अटक केली असल्याचे त्या म्हणाल्या. पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्जनस्थळी पोलिसांची गस्त वाढवावी. रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस यांनी समन्वयातून कामकाज करावे, असे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी गेल्या वर्षभरात ज्या मुली बेपत्ता झाल्या आणि त्यातील काही पुन्हा कुटुंबात परत आल्या अशांचे समुपदेशन करण्यात यावे. विविध सामाजिक संस्थांनी समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यांमधील भरोसा सेल सोबत काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर पंधरा दिवसांतून त्यांचा आढावा घेणारी ऑनलाईन यंत्रणा तयार करावी असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले.
महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होण्याची आवश्यकता असून समाजातील अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी सुसंस्कृत नागरिकांनी पुढाकार घेत पोलिसांच्या समन्वयातून प्रयत्न करावेत, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.
०००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3kYVWRr
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment