मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) क्रूझवर ड्रगपार्टीवर केलेली छापामारी बनावट असल्याचा दावा करतानाच त्यांनी बॉलिवूडचा सुपस्टार अभिनेता शाहरूख (Shah Rukh Khan) खान याच्याबाबत माहिती दिली आहे. अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला पकडण्याचे प्रकरण योग्य आहे की अयोग्य आहे हा प्रश्न आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा सगळा प्रकार बनावट आहे. गेल्या काही दिवसांपासून क्राइम रिपोर्टरना एक मेसेज सर्क्युलेट केला जात होता. तो म्हणजे पुढचे लक्ष्य शाहरूख खान असणार आहे. पत्रकारांना ही माहिती आहे आणि गेल्या एक महिन्यापासून ही माहिती सर्क्युलेट केली जात आहे, असा आणखी एक दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
या बनावट कारवाईमागे भारतीय जनता पक्ष असल्याचा गंभीर आरोप करतानाच मलिक यांनी एनसीबीवर देखील ताशेरे ओढले आहेत. अँटी नार्कोटीक्स सेल देखीलच सतत कारवाई करत असते, अनेकांवर गुन्हे दाखल करत असते. अनेकांच्या चौकशा केल्या जातात. पण तिथे कधी प्रसिद्धीचे काम केले गेले नाही, असे मलिक यांनी म्हटले आहे.
आंतरराज्यीय प्रकरणांवर लक्ष देणे, आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड करणे ही कामे खरेतर एनसीबीने करणे अपेक्षित आहे. मात्र, एनसीबीने कधीही आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड करण्याचे काम केलेले नाही. काही लोक, चित्रपट क्षेत्रातील लोक ड्रगचे सेवन करत असतीलही, पण ते ग्राहक आहेत. अशा फिल्मसिटीतील ग्राहकांना पकडले जाते आणि भरपूर प्रसिद्धी मिळवली जाते. मात्र, अशी प्रकरणे असतील तर एनसीबीने अशी स्थानिक प्रकरणे अँटी नार्कोटिक्स सेलकडे सोपवली पाहिजे होती. आंतरराज्यीय रॅकेट देखील एनसीबीने उघड केलेले नाही. मात्र प्रसिद्धीच्या व्यतिरिक्त एनसीबीचे कोणतेही काम नाही.
अँटी नार्कोटिक्स सेलने जी प्रकरणे गेल्या २ वर्षांमध्ये हाताळली आहेत त्यांची माहिती मी प्रसारमाध्यमांना देण्यास सांगणार आहे, असेही मलिक म्हणाले.
No comments:
Post a Comment