पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीने नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी याकरिता राज्य शासनाला सद्बुद्धी मिळावी यासाठी औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांसह तुळजापूर पर्यंत पायी यात्रा सुरू केली असून या पदयात्रेला समर्थन देण्यासाठी लातूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशआप्पा कराड यांनी रविवारी दुपारी या पदयात्रेत सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगामाचा घास गेला आहे. राज्य सरकारने या शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे आवश्यक होते मात्र असंवेदनशील सरकारने तीन आठवड्यानंतर मदत जाहीर केली तीही तुटपुंजी मदतीची घोषणा करणारे हे सरकार उपकाराची भाषा करीत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला जाग येवून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी आ.अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांसह औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली आहे.
या पदयात्रेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड यांनी रविवारी दुपारी सहभागी होऊन समर्थन दिले. त्याचबरोबर आमदार पवार यांचा ज्ञानेश्वर माऊली ची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. याप्रसंगी माजी मंत्री विनायकराव पाटील, बाजार समितीचे संचालक विक्रम शिंदे, प्रवीण कस्तुरे, भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष मुक्ता, उपाध्यक्ष भागवत सोट, सतीश आंबेकर, अमोल पाटील, औसा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, ज्ञानेश्वर वाकडे, संताजी चालुक्य, बळीराम पाटील, जिलानी बागवान, परमेश्वर बिराजदार, राजकिरण साठे यांच्यासह अनेक जण होते.


No comments:
Post a Comment