मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाला – परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती - latur saptrang

Breaking

Tuesday, October 12, 2021

मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाला – परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती

मुंबई, दि. १२ : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमातंर्गत दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय १२ ऑक्टोबर, २०२१ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.  राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या ९३ हजार कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून, लवकरच त्यांना सप्टेबर महिन्याचे वेतन देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

ग्रामीण भागातील मुलींना इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, याकरिता गांव ते शाळा दरम्यान वाहतुकीची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी “मानव विकास कार्यक्रम” अंतर्गत योजना राबविली जाते. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी दिला जातो. या योजनेंतर्गत एस.टी. महामंडळाच्या बस वाहतूकीच्या खर्चापोटी राज्य शासनाकडून सन २०१३-१४ पासून रक्कम देणे प्रलंबित होते. तसेच इंधन किंमतीची दरवाढ, चालनीय किलोमीटर तफावत, चालक व वाहक यांचे वेतनवाढ व बसेसच्या देखभाल व दुरुस्तीचा वाढीव खर्च इ. विचार करुन पूर्वलक्षी प्रभावाने सन २०१३-१४ पासून वाढीव दराने अनुदान देण्याबाबत परिवहन मंत्री, श्री.परब यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. एस.टी. महामंडळास एकूण रु. ४२८ कोटी ८८ लाख ६२ हजार २०० इतका निधी मंजूर झाला. मे, २०२१ महिन्यात पहिल्या टप्यातील रु. १९७ कोटी ५८ लाख ४० हजार रुपायांच्या अनुदानाची रक्कम यापूर्वीच  एस.टी. महामंडळाला मिळाली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख २२ हजार २०० रूपयांचा निधी एस.टी. महामंडळाला देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निधीमधून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून  त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.असेही श्री. परब यांनी यावेळी सांगितले.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3oXw6zA
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment