ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांच्या कार्यशाळा घेण्याचे निर्देश
ऊसतोड कामगार नोंदणी व ओळखपत्र देण्याची डिजिटल यंत्रणा प्रायोगिक तत्वावर बीड जिल्ह्यात कार्यान्वित, लवकरच हा प्रयोग राज्यात
बीड, दि. 4 : ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यासाठी निघण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना ओळखपत्र देणे अपेक्षित होते मात्र मराठवाड्यात अतिवृष्टीने ओढवलेल्या परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा व्यग्र आहेत त्यामुळे नोंदणी प्रक्रिया मंदावली असली तरी प्रत्येक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची डिजिटल पद्धतीने नोंदणी करून त्यांना तात्काळ ओळखपत्र देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘ई-ऊसतोड कल्याण‘ या ॲपचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
हे ॲप प्रायोगिक तत्वावर बीड जिल्ह्यातील कामगारांची नोंदणी कमीत कमी वेळेत करण्यासाठी तयार करण्यात आले असून यानंतर सबंध राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री.मुंडे यांनी दिली.
गोपीनाथगड (पांगरी) ता. परळी येथील गणेश एकनाथ मस्के हे या डिजिटल नोंदणीद्वारे राज्यातील पहिले ओळखपत्र धारक ऊसतोड कामगार ठरले आहेत. त्यांच्यासह सूर्यभान मोरे, शिवाजी लाटे, शिवाजी गोपाळा आंधळे, राजाराम बापूराव आंधळे, आसाराम बापुराव आंधळे, आश्रोबा गोपाळा आंधळे, भाऊराव संतराम आंधळे, अंकुश श्रीहरी सारुक, लक्ष्मण भगवान आंधळे आदी कामगारांना श्री.मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ओळखपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमास खासदार रजनीताई पाटील, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार लक्ष्मण पवार, आमदार विनायक मेटे, जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाट, उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, बीडचे जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, जि. प. मुख्य कार्य अधिकारी अजित पवार, पोलीस अधीक्षक आर. राजा, माजी आमदार साहेबराव दरेकर यांसह मुकादम संघटनेचे सारंग आंधळे तसेच समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
ऊसतोड कामगारांना लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून भविष्यात राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे हा अत्यंत महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3F9ODye
https://ift.tt/3uBPnra
No comments:
Post a Comment