मुंबई, दि. 2 :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचारांचं स्मरण करुन त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्वक वंदन केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार महात्मा गांधीजींना आदरांजली वाहताना म्हणाले की, गांधीजींनी देशाला सत्याग्रह, अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळवून दिलं. समाजातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांचा लढा लढला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचं कल्याण आहे ही शिकवण दिली. खेडी स्वयंपूर्ण झाली तरच देश स्वयंपूर्ण होईल हा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधीजी ही केवळ व्यक्ती नसून मानवकल्याणाचा, विश्वकल्याणाचा विचार असून तो अमर आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त अभिवादन करुन आदरांजली वाहिली.
माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शास्त्रीजींनी देशाला ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला. त्या नाऱ्याची आजही गरज असून तोच नारा देशाला बलशाली बनवेल. शास्त्रीजींना देशातल्या शेतकरी, सैनिकांबद्दल कणव होती. ते सामान्य माणसाचं दु:ख जाणणारे प्रधानमंत्री होते. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते प्रधानमंत्री पदापर्यंत पोहोचले होते. प्रधानमंत्री झाले तरी जीवनाखेरपर्यंत त्यांची राहणी साधी राहिली. देशवासियांसाठी मृदू असलेले शास्त्रीजी देशाच्या शत्रूंसाठी वज्राहून कठोर होते. देशाचे कणखर प्रधानमंत्री म्हणून त्यांचं जीवन युवकांना, भावी पिढीला सदैव प्रेरणा देईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबहादूर शास्त्री यांचे स्मरण करुन त्यांनाही जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2Y9S2Mo
https://ift.tt/39f9xgE
No comments:
Post a Comment