उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सातारा येथे कोविड आढावा बैठक संपन्न - latur saptrang

Breaking

Monday, October 4, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सातारा येथे कोविड आढावा बैठक संपन्न

सातारा दि.४ (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थिती, विकासकामे आणि अतिवृष्टीबाबत आढावा घेतला.

यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेऊन श्री. पवार म्हणाले, कोविडसाठी निर्माण करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा पुढील काळासाठी उपयुक्त ठरणार आहेत. ऑक्सिजन प्रकल्पासारख्या सुविधांच्या देखभालीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे.  आरोग्य विभागासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयामुळे चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण कराव्यात.

राज्यात काही ठिकाणी डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो आहे.  जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरी व ग्रामीण भागात फवारणीची मोहिम हाती घ्यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या १०० बेड्सच्या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.  कोविड चाचण्या कमी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सदरणीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली.  जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर कमी होत असून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत आढावा

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत झालेले नुकसान आणि देण्यात आलेल्या मदतीची माहिती घेतली. पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पुरात बेपत्ता झालेल्या ३ व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, आपणही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे त्यांनी संगितले. शेतजमिनीचे नुकसान होणाऱ्या भागात पुराच्या पाण्यामुळे यापुढे अधिक नुकसान होऊ नये म्हणून मनरेगाच्या माध्यमातून कामे घेण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. पुरापासून रक्षण करण्यासाठी गावाचे पुनर्वसन करावयाचे असल्यास त्यासाठी जागा निश्चित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

श्री.पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांच्या नुकसानाची आणि प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती घेतली.

बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं.गो.मुंगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  देविदास ताम्हाणे उपस्थित होते.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3mlPuDq
https://ift.tt/39f9xgE

No comments:

Post a Comment