ठाणे, दि.८ (जिमाका) : राज्यात कोरोना काळात जाणवणाऱ्या रक्त टंचाईवर मात करण्याकरिता महारक्तदान शिबीरासारखे उपक्रम उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून उपलब्ध होणारे रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दसऱ्यापर्यंत महारक्तदान सप्ताहाचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के, लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दुर्गाभक्तदान- महारक्तदान या संकल्पातून हा आरोग्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना वंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, रक्तदान हा शब्द बोलायला खूप सोपा आहे पण खरोखर कितीजण रक्तदान करून आपले कर्तव्य निभावतात हा प्रश्न आहे. आजच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान करणाऱ्या सर्व बंधु भगिनींना मनापासून धन्यवाद आहेत. मी टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव विसरु शकत नसल्याचे सांगून आनंद दिघे यांनी सुरु केलेली ही परंपरा आता एकनाथ शिंदे उत्तमप्रमाणे पुढे नेत असल्याचेही ते म्हणाले.
रक्षण करणारी शक्ती
दुर्गामाता अशी शक्ती आहे जिने महिषासुर, नरकासुरासारख्या सर्व असुरांचा वध केला. तिच्या हातात शस्त्र आहे. जे अन्याय चिरडून टाकणारे आहे तसेच गोरगरीबांचे रक्षण करणारे आहे. या शक्तीच्या नवरात्रोत्सव काळात रक्तदाते रक्तदान करून अनेक नागरिकांचे जीव वाचवत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
लोकं स्वत:हून रक्तदान करण्यासाठी पुढे येतांना दिसत आहेत. हे रक्त कुणाला दिले जाते हे पाहिले जात नाही, एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी हे रक्त उपयोगात येईल. सामाजिक कर्तव्य म्हणून रक्तदानाचे श्रेष्ठदान तुम्ही करत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याचा देखील आवर्जुन उल्लेख केला. त्यांनी २०१० साली आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराची आठवण यावेळी सांगितली. त्यावेळी १२ तासात २५ हजारांहून अधिक रक्तदान झाले होते. ही परंपरा आज पुढे जात असल्याचे पाहून आनंद वाटतो असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी सर्व रक्तदात्यांचे पुन्हा एकदा आभार मानले.
रक्त तुटवडा कमी होण्यास मदत – एकनाथ शिंदे
राज्यात कोविड संकटामुळे रक्तदानावर परिणाम होऊन रक्तसंचय कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यास अनुसरून आज टेंभीनाक्याचा नवरात्रोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होत असल्याचे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले की, यामुळे रक्त तुटवडा कमी होण्यास मदत होईल. अनेकांचे जीव वाचवणारे हे रक्त असून रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. श्री.शिंदे यांनी महारक्तदान सप्ताहाच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या जिल्हा रुग्णालयाचे, सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि प्रशासकीय यंत्रणेचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले. रक्तदानाचा महायज्ञ रक्तदात्यांच्या सहभागामुळे नक्की यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रक्तदान सप्ताह
या महारक्तदान सप्ताहात राज्यातील विविध रक्तपेढ्या सहभागी झाल्या आहेत. जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दि. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत हा रक्तदान सप्ताह होत आहे.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3iKXm0q
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment