मुंबई दि. 30- मुंबई शहर पोलीस दलातील कार्यरत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त शुभेच्छापत्र, दिवाळी फराळ, मिठाई आणि छोटीशी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. या दिवाळी शुभेच्छा खर्चासाठी मुंबई पोलीस कल्याण निधीचा वापर करण्यात येतो. ही योजना राज्य शासनाची नसून पूर्णतः पोलीस कल्याण निधीची योजना आहे. यंदा मुंबई पोलिसांकरिता कार्यरत असलेल्या 6 पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीसाठी आवश्यक साहित्यावर 750/- रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, प्रोत्साहन, विविध अधिकारी कर्मचारी सत्कार, आरोग्यविषयक सुविधा, व्यायामशाळा, वाचनालय तसेच पोलिसांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालय दिवाळी शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू स्वरूपात दरवर्षी देत होते.
गेले दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शुभेच्छा पत्र, मिठाई आणि भेटवस्तू वितरित करताना येणाऱ्या अडचणी टाळण्याच्या उद्देशाने भेटवस्तूंऐवजी या रकमेचे थेट साहित्य खरेदी करण्याचा पर्याय सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनमधून खरेदी केलेल्या साहित्यावर 30 टक्के सवलत मिळत आहे. याबरोबरच यावर्षी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पसंतीचे व आवश्यक असे दिवाळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यामधील 750/- रु किमतीचे साहित्य देखील मोफत मिळणार आहे.
मुंबई पोलिसांकरिता कार्यरत असलेल्या 6 पोलीस कॅन्टीनमधून हे साहित्य खरेदी करावयाचे असून ही योजना दि. 30 ऑक्टोबरपासून कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3GAw5If
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment