लोकसहभागातून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा – मुख्य सचिव सीताराम कुंटे - latur saptrang

Breaking

Monday, November 8, 2021

लोकसहभागातून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा – मुख्य सचिव सीताराम कुंटे

मुंबई, दि. 8 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  केंद्र शासनाने आखून दिलेल्या संकल्पनेनुसार आणि लोकसहभागातून राज्यात सर्वत्र कार्यक्रमांचे उत्साहाने आयोजन करून त्यांची माहिती यासाठी निर्मित स्वतंत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत  दिल्या.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ७५ आठवडे राज्यभर विविध कार्यक्रम राबवून अमृतमहोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे.  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा  बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीर, माहिती – तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात व संबंधित अधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, दर्शनिका विभागाचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीज जास्त स्थानिक, युवा, विद्यार्थी यांचा सहभाग घ्यावा.  खासगी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने आणि सहभागाने उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे असल्याचेही, मुख्य सचिव श्री.कुंटे यांनी सांगितले.

गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी, पोलीस बँड पथकाद्वारेही देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. अज्ञात स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यकालीन महत्त्व असलेली स्थळे प्रकाशात आणण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.

महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी सूचना केली की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे फक्त उत्सवी स्वरूप न राहता कायमस्वरूपी स्मरण राहील, असे भरीव स्मारक उभे करण्याबाबतही सर्व संबंधितांनी प्रस्तावित करावे.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी प्रास्ताविक केले तर सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सादरीकरण केले.

विविध जिल्ह्यांत आजवर  झालेल्या कार्यक्रमांची माहिती संबंधित विभागीय आयुक्तांनी दिली. दर्शनिका विभागाचे संचालक डॉ.दिलीप बलसेकर यांनी प्रत्येक जिल्ह्याचे विशेष पुरवणी गॅझेट तयार करण्यासंदर्भात व गॅझेटच्या आकृतीबंधाबाबत माहिती दिली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड १ ( सन १८१८) ते खंड १३ भारत छोडो डिसेंबर १९४२ या  ग्रंथाचे चार ई बुक संच यावेळी  मुख्य सचिव यांना सांस्कृतिक कार्य सचिव यांच्या हस्ते भेट देण्यात आला.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3obxgp0
https://ift.tt/30158wH

No comments:

Post a Comment