निवळे गावातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे - latur saptrang

Breaking

Tuesday, November 16, 2021

निवळे गावातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 16 :- कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय अभयारण्याअंतर्गत निवळे गावातील बाधित गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आणि तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करणे गरजेचे आहे. केंद्र शासनाला पुनर्वसनासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यासाठी चांदोली वन जमिनीवर करण्यात येणाऱ्या पुनर्वसनाचा अहवाल आणि संबंधित प्रस्ताव पुढील आठ दिवसात सादर करावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात चांदोली राष्ट्रीय अभयारण्यांतर्गत बाधित झालेल्या निवळे गावाच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी निवळे गावातील बाधित गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवून, गेली अनेक वर्षे नुकसान सहन करत असलेल्या गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याचे सांगितले.

वन विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाने वन जमिनीवरील पुनर्वसन कार्य अहवालातील त्रुटींची पूर्तता 8 दिवसात करून तातडीने प्रस्ताव नागपूर वन विभागाला पाठविण्याचे निर्देश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. तसेच, नागपूर वन विभागीय कार्यालयाने तातडीने त्या प्रस्तावावर कार्यवाही करावी. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या निवळे गावाच्या पुनर्वसनाबाबत कार्यवाहीस गती देऊन गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

या बैठकीस नागपूर वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी.एस.हुडा, मुंबई वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व नोडल अधिकारी नरेश झुरमुरे, कोल्हापूर वन वृत्तचे मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, महसूल व वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर, कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक आर आर काळे आदी उपस्थित होते.

0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3qIK49A
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment