शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आता ७५ व ८० टक्के अनुदानावर मिळणार; अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार – कृषि मंत्री दादाजी भुसे यांची माहिती - latur saptrang

Breaking

Saturday, November 20, 2021

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आता ७५ व ८० टक्के अनुदानावर मिळणार; अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार – कृषि मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई, दि. २० :-  शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के) कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते. शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी फिली आहे.

या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता. शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करुन सदर योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे. राज्यामध्ये आतापर्यंत २५.७२ लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता रु.५८९ कोटी रकमेस शासनाची प्रशासकिय मान्यता आहे. सूक्ष्म सिंचनाची योजना ‘मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबविणार असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. लाभार्थ्याची पारदर्शकपणे निवड करणेसाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून, त्यावर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन योजनेचा लाभ घेता येईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सादर करून सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3kUnuXy
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment