भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी येथील सुविधांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा - latur saptrang

Breaking

Tuesday, November 2, 2021

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी येथील सुविधांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. २ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आढावा घेतला.

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीस खासदार राहुल शेवाळे, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव  दिनेश डिंगळे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भदन्त डॉ. राहुल बोधी महाथेरो, सिद्धार्थ कासारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोविडचा संभाव्य धोका पाहता गर्दी कमी राहील यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. कोविडमुळे मागील दोन वर्षी महापरिनिर्वाणदिनी अनुयायांसाठी ऑनलाईन अभिवादनाची सुविधा उपलब्ध करुन दिली होती तशीच सुविधा यावेळी देखील उपलब्ध करुन द्यावी लागेल, अनुयायांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना पाणी, जेवण आणि वैद्यकीय सुविधेसह इतर सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचनाही श्री.आठवले यांनी यावेळी दिल्या.

महापरिनिर्वाणदिनी विविध प्रशासकीय विभागांनी, महानगरपालिकेने सर्व आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले. कोविडच्या काळात अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने केलेल्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पुरविल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती यावेळी सहायक आयुक्त श्री. दिघावकर यांनी दिली. पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांविषयी डॉ. वारके आणि ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उपस्थितांना माहिती दिली.

महापरिनिर्वाणदिनी शासनाच्या वतीने विविध सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी यावेळी केली.  बैठकीला सार्वजनिक आरोग्य, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इंदू मिल येथे साकारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या स्मारकाच्या कामाचाही यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आढावा घेतला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि या स्मारक प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार यावेळी उपस्थित होते.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3jUySSQ
https://ift.tt/3GFKqmK

No comments:

Post a Comment