मुंबई, दि. 17 : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील मच्छिमारांच्या समस्यांचे नियमांतर्गत निराकरण करण्यात यावे. स्थानिक मच्छिमारांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय करताना मिनी पर्सेसीन बोटीला परवानगी मिळण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, याचबरोबर खलाशी भरतीमध्ये पात्र स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
रायगड येथील स्थानिक मच्छिमारांना येणाऱ्या विविध समस्या, मत्स्य परवाना, जेट्टी बांधणे, खडींचे अडथळे, नोकरीत स्थानिकांना प्राधान्य, घरकुल, किसान क्रेडीट कार्ड यासंदर्भात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शर्मा, वरिष्ठ अभियंता सुधीर देवरे, सह आयुक्त रा.ज. जाधव, सहायक आयुक्त सुरेश भारती यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, रायगड जिल्ह्यातील आदगाव कोळीवाडा येथे नौका नोंदणीसंदर्भात मत्स्य व्यवसाय विभागाने दिलेल्या नियमांचे पालन संबंधित अधिकाऱ्यांनी करावे. येथे असलेल्या ८० ते ९० मासेमारी नौका खडकाळ किनाऱ्यामुळे सुरक्षित नाहीत, त्या सुरक्षित करण्यासाठी ५० हजार चौरस मीटरचा खडकाळ भाग मोकळा करण्याच्या कामांना गती द्यावी.
आदगाव येथील मासेमारी बंदराचा विकास करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यासंदर्भातील कामास गती देण्यात येईल, मच्छिमारांची बँक असण्यासंदर्भातील प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही श्री.भरणे यांनी सांगितले.
तीन प्रस्तावित जेट्टींच्या कामास गती द्यावी. ज्या मच्छिमार संस्था बंद आहेत त्यांना मोठ्या सुरू असलेल्या संस्थेत वर्ग करून डिझेल उपलब्ध करून द्यावे. स्थानिक बँकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून किसान क्रेडिट कार्डचे निधी उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचनाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
०००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3qIKxbx
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment