भारतीय संविधान जगाला आदर्श; देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकद संविधानात - latur saptrang

Breaking

Thursday, November 25, 2021

भारतीय संविधान जगाला आदर्श; देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकद संविधानात

मुंबई, दि. 25 : भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकद या संविधानात आहे, असे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले. दि. 26 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होत असलेल्या संविधान दिनानिमित्त त्यांनी संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्ताने भारताच्या संविधानाबाबत जनता 100% साक्षर व्हायला हवी, संविधान घराघरात पोहोचावे. नागरिकांना आपले हक्क व कर्तव्ये यांची पूर्णपणे जाणीव असावी. तसेच आपल्या संविधानाप्रति व लोकशाही मूल्यांच्या प्रति जागरूकता असावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही मंत्री श्री.मुंडे यांनी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत नुकतेच अंध दिव्यांगांसाठी ब्रेल लिपितुन देखील संविधान निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे अंध दिव्यांग सुद्धा आता संविधान साक्षर होत आहेत, याचा आनंद असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

आज संविधान दिनाच्या निमित्ताने जबाबदार नागरिक म्हणून आपसातील समता व बंधुभाव दृढ करत आपल्या संविधानाचे रक्षण व सन्मान करण्याचा संकल्प करूया, असे आवाहनही सामाजिक न्याय मंत्री  श्री.मुंडे यांनी केले आहे.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3FJJ2y8
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment