पाणीपुरवठा योजनांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावित – राज्यमंत्री संजय बनसोडे - latur saptrang

Breaking

Tuesday, November 23, 2021

पाणीपुरवठा योजनांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावित – राज्यमंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. 23 :- जल ही जीवन हे ब्रीद लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद आदी संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून कामे पूर्ण करावित, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

श्री. बनसोडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत शिरूर-हवेली, रिसोड-मालेगाव, नांदेड दक्षिण आदी मतदारसंघांमधील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित क्षेत्रातील विधानसभा सदस्य सर्वश्री अशोक पवार, अमित झनक, मोहनराव हंबर्डे यांच्यासह विधानसभा सदस्य  शेखर निकम, संदीप क्षीरसागर, आशुतोष काळे, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन अभियानचे संचालक ऋषिकेश यशोद तसेच संबंधित मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. बनसोडे म्हणाले, ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे प्रती व्यक्ती 55‍ लिटर गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल जीवन अभियान आदी यंत्रणांनी आपल्याकडे प्रलंबित असलेल्या कामांना तातडीने मंजुरी घेऊन कालबद्ध पद्धतीने ती पूर्ण करावित. ज्या कामांना मंजुरी प्राप्त झालेली आहे ती कामे डिसेंबर अखेर पर्यंत तर इतर कामे जानेवारी अखेरपर्यंत सुरू करावीत. जेथे जलस्त्रोत उपलब्ध नाहीत अशा गावांसाठी जलस्त्रोतांची निर्मिती करणे व जेथे जलस्त्रोत उपलब्ध आहेत त्यांचे बळकटीकरण करणे, पूरक स्त्रोत निर्मिती करणे, लोकसंख्या वाढीनुसार जुन्या योजनांची आवश्यकतेनुसार पुनर्जोडणी करणे या कामांना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली. कोणतीही शाळा आणि अंगणवाडी पाणी पुरवठ्याविना राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रधान सचिव श्री.जैस्वाल यांनी पाणी पुरवठ्याच्या संबंधित कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी तांत्रिक मनुष्यबळ अपुरे आहे तेथे कंत्राटी पद्धतीने पद भरण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत, त्यांच्या मदतीने योजनेची प्रशासकीय कामे तातडीने पूर्ण करून दिलेल्या मुदतीत कामे सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी संबंधित लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी मागणी केली.

 

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2ZfcIDI
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment