कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर? एकाच आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 181 टक्क्यांनी वाढ - latur saptrang

Breaking

Monday, January 3, 2022

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर? एकाच आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 181 टक्क्यांनी वाढ



 Coronavirus Third Wave in India : देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्याशिवाय कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. रविवार संपलेल्या आठवड्यात मागील सात दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत तीनपटीने वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील आठवड्यात देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत 181 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता देशात कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचे म्हटले जात आहे. 

देशात एकाच आठवड्यात (27 डिसेंबर ते 2 जानेवारी) जवळपास 1.3 लाख नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ही संख्या मागील 12 आठवड्यातील सर्वाधिक संख्या आहे. या आधी सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद 5 ते 11 एप्रिल 2021 दरम्यान नोंदवण्यात आली होती. त्यावेळी देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू होती. 

कोरोनाबाधितांची सर्वाधिक वाढ महाराष्ट्रात नोंदवण्यात आली आहे. मागील आठवड्याच्या दरम्यान 41980 बाधितांची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढ होत आहे. बिहारमध्ये ही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या आठवड्यात कोरोनाबाधितांच्ये संख्येत 12 पटीने वाढ नोंदवण्यात आली होती. त्याशिवाय, दिल्ली, पश्चिम बंगालमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली होती. 

महाराष्ट्रत बाधितांच्या संख्येत वाढ

रविवारी राज्यात 11 हजार 877 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रविवारी दोन हजार 69 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापार्यंत 65 लाख 12 हजार 610 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.21 टक्के इतका झाला आहे. तर, राज्यात 510 ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment