पोलीस कर्मचार्‍यांच्या पगारातून होणार 30 ते 50 हजार कपात - latur saptrang

Breaking

Sunday, January 23, 2022

पोलीस कर्मचार्‍यांच्या पगारातून होणार 30 ते 50 हजार कपात



 नागपूर : पोलिसांच्या प्राप्तिकराची रक्कम जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या पगारातून कापावी, असे आदेश निघाले आहेत. पगारातून पुढील दोन महिने साधारणत: ३५ ते ५० हजार रुपयांची कपात होईल. गुंतवणुकीच्या नोंदी योग्य पद्धतीने केल्या नसल्याने असा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. इतकी मोठी पगारकपात होईल तर इतर खर्च कसे भागवावे, अशी व्यथा पोलिसांनी आपल्या वरिष्ठांकडे मांडली आहे.


पोलीस विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन किती, त्यांची गुंतवणूक किती, त्यांचे किती उत्पन्न करपात्र ठरते, याची नोंद आणि त्याचे व्यवस्थापन पोलिसांनी ठरविलेली सीए कंपनी करीत असते. येणाऱ्या कराचे भाग पाडून, महिन्याच्या पगारातून ठराविक रक्कम कापली जाते. त्यामुळे पोलिसांवर त्याचा फारसा ताण येत नाही. यावर्षी मात्र पोलिसांनी सीए कंपनी बदलली आणि काहीतरी गडबड झाली. कुणाच्या नोंदी बरोबर झाल्या नाहीत. कुणाच्या काही चुका झाल्याची माहिती आहे. पोलीस आयुक्तालयातील अधीक्षक कार्यालयाने शुक्रवारी सगळी ठाणी व संबंधित विभागांना एक पत्र पाठविले. ज्यांचा प्राप्तिकर २० हजारांहून अधिक आहे, तो जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांच्याच पगारातून कापला जाईल, असे सांगितले गेले. त्यामुळे पोलिसांत आकडेमोड सुरू झाली. कुणाला दीड लाख, कुणाला एक लाख, कुणाला पन्नास हजार रुपये प्राप्तिकर दोनच महिन्यांत भरायचा आहे. ज्यांचे पगार जेमतेम आहेत, त्यांचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


सर्वाधिक ६५ हजारांची कपात

शहर पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाकडे १ लाख ३० हजार रुपये प्राप्तिकर आहे. या अधिकाऱ्याच्या जानेवारीतील वेतनातून ६५ हजार रुपये कपात करण्यात येणार असल्याचे कळते. संबंधित अधिकाऱ्याच्या दर्जातील अधिकाऱ्याची ही सर्वाधिक वेतन कपात असल्याची चर्चा विभागात आहे. कुणाला ८७ हजार ९५० तर कुणाला ८० हजार २६० एवढा प्राप्तिकर भरायचा आहे.

डीजींना मदतीची याचना, पत्र व्हायरल

वेतनकपातीच्या आदेशाने पोलीस कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे. यामुळे उपासमारीची वेळ येणार असल्याचे पत्र पोलीस महासंचालकांना लिहिण्यात आले. वेतनकपातीत सवलत देण्याची नम्र विनंती यात करण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्याने लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्राप्तिकरचे काम नवीन कंपनीला देण्यात आले आहे. डिसेंबरमध्येच हे काम व्हायला हवे होते. परंतु, कंपनीने ते केले नाही. गृहकर्ज, विमा व इतर कपातीचे हप्ते कंपनीने जोडले नाहीत त्यामुळे ३५ ते ५० हजारांपर्यंत वेतनकपात करण्यास सांगितले आहे, असेही व्हायरल पत्रात म्हटले आहे.

मांडल्या व्यथा...

नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी 'मटा'कडे व्यथा मांडल्या. 'आम्हाला मुलांच्या शिक्षणाचा खर्च, गृहकर्ज, विमा आदींसह पालन-पोषणासाठी पैसे लागतात. अचानक दोन महिने मोठी वेतन कपात झाल्याने उधार मागण्याची वेळ येईल. वेतन कपातीनंतर मला २८ हजारांपेक्षाही कमी रुपये मिळतील. यात मी गृहकर्ज व इतर कर्जे कसे फेडू', असा सवाल कर्मचाऱ्याने केला. हीच परिस्थिती शहर पोलीस दलातील सुमारे ७० ते ८० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे, असेही त्याने सांगितले.

No comments:

Post a Comment