मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना खास भेट दिली आहे. मुंबईतील ५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मुंबईतील तब्बल १६ लाख कुटुंबांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोलेही लगावले. अनेकदा आम्ही हे केलं, ते केलं, असे होर्डिंग्ज राजकीय पक्षांकडून लावले जातात. विकास प्रकल्प मार्गी लावणे म्हणजे मोठी गोष्ट नाही,आपण फक्त आपलं काम करत असतो. त्यामुळे जनतेच्या पैशातून स्वत:ची जाहिरात करणे हे मला पटत नाही. मात्र, राजकारणात आपण काही सांगितलं नाही तर विरोधक हे काही करतच नाही, असं म्हणतात. काही केलं तर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. त्यामुळे राजकारणात आपल्यालाच स्वत:ची टिमकी वाजवावी लागते, असे उद्धव यांनी म्हटले.
अनेकजण आम्ही चंद्र आणि तारे तोडून आणू, अशा पद्धतीची आश्वासने देतात. जनता या आश्वासनांना भुलून मत देते आणि फसते. त्यानंतर पाच वर्षात त्याबद्दल एकही शब्द काढला जात नाही. वर्षभराने कोणी विचारले तर निवडणुकीत असं बोलावं लागतं, असे काही राजकारण्यांकडून सांगितले जाते. मात्र, एखादं आश्वासन खोटं असेल, भले त्यामुळे निवडणूक जिंकता येत असेल तरी मी ते देणार नाही. निवडणूक जिंकण्यासाठी खोटं वचन द्यायचं ही शिवसेनेची परंपरा नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
'आदित्यने माझा बराच भार हलका केलाय'
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या काळात स्वत: नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी करायचे. हे पाहत मी मोठा झालो आणि मीदेखील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी घरातून बाहेर पडायला लागलो. आता आदित्यने माझ्यावरील कामाचा बराच ताण कमी केला आहे. तो रात्री-अपरात्री शिवसेनेचे नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत विकासकामांची पाहणी करतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment