Nanded: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन नांदेड इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले. परंतु, जिल्हा प्रशासनाच्या या आदेशाची पायमल्ली करत कोरोना नियमांना तिलांजली देत नांदेड शहरातील काही कोचिंग क्लासेस राजरोसपणे चालत होते. त्यामुळं कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या पथकाकडून नांदेड शहरातील चार कोचिंग क्लासेसला तब्बल 95 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.
नांदेड शहरात बुधवारी कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. दरम्यान, एकाच दिवशी जिल्ह्यात 474 रुग्ण आढळून आले. त्यामुळं प्रशासकीय यंत्रणा हादरून गेलीय. कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरेल असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवलाय. महापालिकेने 12 जानेवारीपासून शहरात कोरोना नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी तेरा पथके कार्यान्वित केले आहेत. या पथकाने गुरुवारी शहरातील कोचिंग क्लासेसला भेटी दिल्या. यावेळी कोचिंग क्लासेसमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित असल्याचं निदर्शनास आलं. अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता. त्यामुळं महापालिकेच्या या पथकानं कोचिंग क्लासेसच्या संचालकांना दंड ठोठावलाय.
यामध्ये सर्वाधिक 50 हजार रुपये दंड आरसीसी क्लासेसला ठोठावण्यात आलाय. तर, शांभवी क्लासेसला 25 हजार, दरक कोचिंग क्लासेसला 10 हजार रुपये आणि सलगरे कोचिंग क्लासेसला दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वाखालील महापालिका पथकाने ही कारवाई केली आहे. यापुढेही शहरात अशीच कारवाई सुरू राहील असे नांदेड महापालिकेच्या उपायुक्तांनी सांगितलंय.
No comments:
Post a Comment