महापौर किशोरी पेडणेकर : 'मुंबई अशांत करू नका, करायची असेल तर मैदानात या'
मुंबई;
मालवणीमध्ये होत असलेल्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव दिल्याने भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. या प्रकरणात भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला जाहीर आव्हान दिले आहे. मैदानाच्या नावाशी महापालिकेचा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजप आताच टिपू सुलतानच्या नावाला विरोध का करत आहे ? अशी विचारणाही त्यांनी केली. मुंबईतील ज्या रस्त्यांना टिपू सुलतानचे नाव दिले ते भाजप नेत्यांच्या अध्यक्षतेखालीच देण्यात आली होती, असे त्या म्हणाल्या. मुंबई शांत आहे, अस्थिर करू नका, अस्थिर करण्याऐवजी विकासावर लक्ष द्या असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
टिपू सुलतान नावावरून प्रजासत्ताक दिनी भाजपचे आंदोलन
भाजयुवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांच्या नेतृत्वात मालवणी येथील आंदोलन करण्यात आले. आंदोलन पांगवण्यासाठी पोलीसांनी काही कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. दुसरीकडे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचेही कार्यकर्ते समोर आल्याने तणाव निर्माण झाला.
आता या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो देशगौरव होऊ शकत नाही. त्याचे नाव मैदानाला देणे सर्वथा गैर आहे. आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. हा निर्णय रद्द झाला पाहिजे.
दुसरीकडे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, गेल्या ७० वर्षांपासून टिपू सुलतान नावावरून कोणताही वाद नव्हता, पण आज भाजपने देशाला बदनाम करण्यासाठी गुंड पाठवले आहेत. प्रकल्पांच्या नावावरून भाजप राडा करत देशाच्या विकासाला खीळ घालत आहे. आपल्याला नामकरणावरून वादात जाण्याची गरज नाही.
No comments:
Post a Comment