मुंबई, दि. 25 :- लोकशाही परंपरांचे जतन आणि निवडणुकांचे पावित्र्य राखण्याची शपथ आज मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही शपथ दिली.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोविड-19 बाबत सर्व शासकीय नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, उपनिवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
“राष्ट्रीय मतदार दिवस” 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. त्याअनुषंगाने 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन तरूण मतदारांचा यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रकियेत सहभाग वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने सर्व शाळा व शैक्षणिक संस्थामध्ये वादविवाद स्पर्धा, प्रारूप मतदान, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादी आयोजित करून लोकशाही व मतदाराचा सहभाग यांचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.
25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि म्हणून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करावा, असे निश्चित करण्यात आले. सन 2011 पासून राष्ट्रीय, राज्य, राज्य मुख्यालय, जिल्हा आणि मतदार संघ अशा सर्व स्तरांवर हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो.
मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला अथवा दबावाला बळी न पडता आपले प्रतिनिधी निवडावेत त्याचबरोबर आपल्या देशातील निवडणूक प्रक्रिया जाणून घ्यावी, पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करावी यासाठी मतदार जागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने संपूर्ण वर्षभर मतदार जागृती (Systematic Voter Education and Electoral participation) म्हणजेच स्वीप कार्यक्रम राबविण्यात येतो. त्याचा एक भाग म्हणून ‘लोकशाही भोंडला’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातून जवळपास 500 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात मंत्रालयातील महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला होता. यापैकी काही गटाने सांघिक बक्षिसेही पटकावली. त्यातील काही विजेत्या संघांचा प्रातिनिधिक स्वरुपामध्ये मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन कणिका जाधव यांनी मानले.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3KFU0rK
https://ift.tt/3GcqmqR
No comments:
Post a Comment