औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दुकानांवरील नामफलक मराठीत लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता याच निर्णयावरून राजकीय वातावरण पेटताना दिसत आहे. कारण आधीच या निर्णयावरून शिवसेना-मनसेत श्रेयवाद सुरू असतानाच एमआयएमच्या एन्ट्रीने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
दुकानांवरील नामफलक मराठीत लावण्याच्या निर्णयावर बोलताना, मराठीत पाट्या लावण्यासाठी सरकारने शासकीय निधी द्यावा अशी मागणी एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. तर आता जलील यांना उत्तर देताना, खासदारांनी स्वतःच्या निधीतून मराठीतील पाट्या लावाव्यात, असा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला आहे.सरकारने दुकानांवरील पाट्या मराठीत लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुकानदारांनी स्वतः अमंलबजावणी करावी, अन्यथा यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक, माजी सभापती राजू वैद्य यांनी दिला. त्यामुळे आता यावर एमआयएमची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.
मनसे आणि शिवसेनेत श्रेयवाद...
दुकानावरील पाट्या मराठीत करण्याचा निर्णयानंतर मनसेकडून शहरात मनसेने मराठी पाट्या असणाऱ्या दुकानदारांना गौरवपत्र देऊन सन्मान करण्याची मोहीम हाती घेत, मनसेच्या मागणीला यश आल्याचा दावा केला आहे. तर शिवसेनेने सुरुवातीपासून मराठी भाषेतून पाट्या लावण्याची मागणी केलेली आहे. मराठी राजभाषा संवर्धन विभागाने दुकानांना मराठीतूनच पाट्या लावण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीतून पाट्या लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा शिवसेनेचे नेते वैध यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment