श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेने शिक्षणाची ज्ञान ज्योत प्रज्वलित करून लोकांच्या जीवनातील अंधकार दूर केला ---जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी - latur saptrang

Breaking

Friday, January 7, 2022

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेने शिक्षणाची ज्ञान ज्योत प्रज्वलित करून लोकांच्या जीवनातील अंधकार दूर केला ---जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी





  लातूर, जानेवारी 7  स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या इतिहासातील अत्यंत कठीण  कालखंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निजाम काळात पुरोगामी विचार घेऊन स्व. सेठ पुरणमलजी लाहोटी यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था शिक्षणाची ज्ञानज्योत प्रज्वलित करून समाजातील लोकांच्या जीवनातील अंधकार दूर करून समाजाला प्रकाशमान करण्याचे काम आजही अखंडपणे करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी येथे बोलताना केले.  श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा 82 वा वर्धापन दिन शुक्रवारी कोरोना नियमांचे पालन करून श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शैलेशकुमार लाहोटी होते. संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार मालपाणी, सह उपाध्यक्ष दिनेशकुमार ईनाणी, सहसचिव शरदकुमार नावंदर यांचीही व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.   जिल्हाधिकारी म्हणाले की, मराठवाडा भौगोलिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. दर दोन वर्षांनी एनजीओ चा सर्वे होतो.  2018 च्या सर्वेनुसार  जिल्ह्यानुसार पाहिले तर परभणी जिल्हा शिक्षणात प्रथम प्रथम स्थानी असून लातूर शिक्षणात मागे असल्याचे दिसून आले आहे. सर्वात उत्कृष्ट टेस्टिंग लेवल मध्ये भारताचा शेवटचा नंबर लागतो अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगून  शिक्षण क्षेत्रात खूप  काम करण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.  खाजगी शाळांतील चांगली शिक्षणाची पद्धती जिल्हा परिषदांच्या शाळेत राबविण्याचा प्रयत्न असून श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे ज्ञानदानाचे कार्य उत्कृष्ट असून सामाजिक जबाबदारीतून संस्थेने जिल्हा परिषदेच्या शाळांशी टाय-अप करून शिक्षकांना प्रशिक्षण व अनेक बाबींचा माध्यमातून शाळेचा विकासाठी पुढाकार घेतल्यास  विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल अशी विनंती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. संस्थेचे अध्यक्ष शैलेशकुमार लाहोटी आपल्या भाषणात म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश टाकणारी शिक्षण संस्था कोरोनाच्या संकटातही अखंडपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. संस्था अंतर्गत सर्व शाळा भौतिक सुविधांनी परिपूर्ण असून सामाजिक समरसता हे संस्थेचे वैशिष्ट्य आहे. सर्व जाती-धर्मांचे विद्यार्थी संस्था अंतर्गत विविध शाळांत दर्जेदार शिक्षण घेत आहेत. जे जे नवे ते आम्हास हवे या धोरणानुसार शिक्षण प्रवाहातील सर्व आधुनिक अभ्यासक्रम चालविण्याचे धोरण संस्था राबविते. ज्या सामाजिक बांधिलकीतून शिक्षण संस्था उभी राहिली, वाढली व कार्यरत आहे, यात विद्यार्थी, पालक व शिक्षकांची मोलाची साथ आहे. यांचा विश्वास असाच कायम राहावा व वृद्धिंगत व्हावा यासाठी सदैव प्रयत्न करू.  याप्रसंगी गोदावरी देवी लाहोटी विद्यालयातील वर्षा भगवानराव देशपांडे यांना कै. भास्करराव शंकरराव जोशी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार-2022 (रोख 5000, सन्मानचिन्ह, शाल), राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा मुख्याध्यापिका विद्या बाबासाहेब साळवे यांना श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार-2022  (रोख 5000, सन्मानचिन्ह, शाल) व राजस्थान विद्यालयातील कर्मचारी विश्वनाथ सलवय्या स्वामी यांना रामनाथ भराडिया आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार-2022 (रोख 5000, सन्मानचिन्ह, शाल) देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. सुनंदा कुलकर्णी, कविता दंडे ज्योती होळीकर, मीरा जोशी या सेवानिवृत शिक्षिकांचाही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हाअधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्या हस्ते संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव शरदकुमार नावंदर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगिता घुगे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्रकुमार मालपाणी यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी सर्व शाळांचे प्रमुख यांची उपस्थिती होती तर विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी द्रक श्राव्य प्रणालीचा माध्यमातून कार्यक्रमाला हजेरी लावली.

No comments:

Post a Comment